फलटण : संगिनी फोरमच्या माध्यमातून अपर्णा जैन व त्यांच्या सहकारी भगिनी समाज व्यवस्थेमध्ये जे सामाजिक काम करीत आहेत ते दखलनीय आहे. समाज व्यवस्थेमध्ये धन संपत्तीने कोणी कितीही मोठा असो, परंतु ज्याला सामाजिक भान असते तोच माणूस अथवा संघटन समाजाची सेवा करतो. त्या पार्श्वभूमीवर संगिनी फोरमचे कार्य सामाजिक उत्तरदायीत्व दर्शविते असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार रमेश आढाव यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून संगिनी फोरम, फलटण यांच्यावतीने पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन, माजी अध्यक्षा निना कोठारी, सदस्या सौ.निलम डुडु, स्वप्ना शहा यांच्यासह चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे खजिनदार अरिंजय शहा, ज्येष्ठ व्यापारी कांतीलाल कोठारी (बुधकर), व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व श्री चंद्रप्रभू जैन मंदिरचे विश्वस्त मंगेश दोशी, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त राजेंद्र कोठारी, श्रीपाल जैन यांच्यासह विविध दैनिकांचे प्रतिनिधी, साप्ताहिक, पोर्टल व यूट्यूब चॅनेलचे संपादक, प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
आजवर संगिनी फोरमच्या माध्यमातून जे नानाविध सामाजिक उपक्रम रबविले गेले आहेत, त्या प्रत्येक उपक्रमांना पत्रकार बंधूनी यथोचित प्रसिद्धी दिली आहे, त्याचाच परिपाक म्हणून फलटणच्या सांगिनी फोरमला खूप मोठा बहुमान मिळाला आहे. आजवर जेवढे पदाधिकारी झाले त्या सर्वांना पत्रकारांचे बहुमोल सहकार्य लाभले असल्याचे संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर अरिंजय शहा यांचाही वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत सौ.निलम डुडु यांनी केले. प्रास्तविक व सूत्रसंचालन श्रीपाल जैन यांनी केले. आभार निना कोठारी यांनी मानले.