फलटण : शहरात गेल्या दोन दिवसात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी स्वतः नगरपालिकेचे मुख्याधिकारी व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांना बरोबर घेऊन पूर्ण शहरात प्रभागनिहाय प्रत्यक्ष चालत पाहणी केली व नागरिकांच्या अनेक प्रश्नांचा जागच्या जागी निपटारा केला. लोकप्रतिनिधी सजग व कार्यकर्तृत्व असला तर प्रशासन कसे हलते व पळते याचा सुखद अनुभव नागरिकांनी घेतला. त्यामुळे लोकप्रतिनिधिंनी याच पद्धतीने कार्यरत राहावे अशी मागणी जोर धरत असून तूर्तास जिल्ह्यात सर्वत्र माजी खासदारांचा ‘धडाका’ व आमदारांचा ‘तडका’ चर्चेचा ठरतोय.
फलटण कोरेगाव मतदार संघाचा निवडणूक निकाल लागून दि. २३ रोजी बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. या निवडणुकीत आमदार सचिन पाटील यांनी या मतदारसंघातून २००९, २०१४ व २०१९ अशा तीन वेळा निवडून आलेल्या दीपक चव्हाण यांना पराभूत करून सनसनाटी विजय मिळाविला. निकालानंतर नंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार पाटील यांनी आपला धडाका दाखविण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम फलटण नगरपालिकेत मुख्याधिकारी, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक, नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली, या बैठकीत रणजितसिंह यांनी विचारलेले अभ्यासपूर्ण प्रश्न व त्याला उत्तरे देताना अधिकाऱ्यांची उडालेली भंबेरी अनेकांनी प्रत्यक्ष पहिली होती. त्यानंतर आता आमदार सचिन पाटील यांच्या समवेत दोन दिवस शहरात प्रभाग निहाय गल्ली बोळात पाहणी दौरा करून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांचे प्रश्न जाणून घेतले तर काही समस्यांचा जागेवरच निपटारा केला. लोकप्रतिनिधी अशा प्रकारे काम करू शकतो व संपूर्ण प्रशासन व्यवस्था कामाला लावू शकतो असे सुखद चित्र फलटण शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षात पहायला मिळाले नाही अशा प्रतिक्रिया अनेक नागरिक व महिलांनी या निमित्ताने व्यक्त केल्या.
पाहणीमधील रणजितसिंह यांचे काही निर्धार –
▪️ फलटण शहरात बाणगंगा नदीचे लंडनमधील थेम्स नदीच्या धर्तीवर सुशोभीकरण करून बोटिंग करणे
▪️ फलटण शहर स्वच्छ व सुंदर बनविणे
▪️ फलटण शहाराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
▪️ फलटण शहारासह ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा दौरा करून तेथे आवश्यक सुखसुविधा व विकास कामे करणार
▪️ फलटण शहाराला पाणी पुरवठा करणारे पंप हाऊस व नगरपालिकेचे विश्रामगृह इमारतीस सुस्वरूप प्राप्त करून देणार
▪️ फलटण शहाराला नियमित व निर्मळ पाणीपुरवठा
▪️ ऑफिसर्स क्लब सुरु करून पाणी पुरवठा योजना परिसरात सुरक्षितता निर्माण करणार
▪️ पूर्वीच्या काळात लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्षामुळे शहराची प्रचंड दुरावस्था ती दूर करण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार
▪️ फलटणकरांनी जे प्रेम दाखविले त्याची उत्तराई त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा संकल्प
आमदार सचिन पाटील यांचे निर्धार –
▪️ फलटण शहाराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
▪️ स्वच्छतागृहांच्या प्रश्नास प्राधान्य देऊन शहरात आवश्यक ठिकाणी महिला व पुरुषांसाठी तातडीने फायबरची स्वच्छतागृहे तैनात करणार
▪️ प्रत्येक प्रभागातील गटार, चेंबर व रस्ते यांच्यामध्ये सुधारणा करणार
▪️ नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन स्वच्छ पाणी पुरवठा होण्यास प्राधान्य देणार
▪️ विरोधकांनी वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवलेली कामे पूर्णत्वास नेणार
▪️ शहरातील समाजमंदीरे सुस्थितीत आणणार
▪️ व्यापारी व बाजारपेठेतील समस्यांचे निराकरण करणार
▪️ व्यायामशाळांची दुरावस्था दूर करणार
▪️ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविणार
▪️ पार्किंगच्या प्रश्नावर नगरपालिका, पोलीस व आरटीओ यांची संयुक्त बैठक
▪️ गर्दी होणाऱ्या चौकांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न