फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विद्यापीठ स्तरावर उज्वल यशाची परंपरा राखत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षीही चमकदार कामगिरी केली आहे.
शंकरराव जगताप आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज वाघोली (ता. कोरेगाव) येथे नुकत्याच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. या विद्यापीठस्तरीय स्पर्धेमध्ये नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील जयंत नितीन शेडगे बी. ए. द्वितीय वर्ष याने (५५ किलो गट) ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. बी. ए. प्रथम वर्ष मधील गणेश महादेव सोडमिसे याने (खुला गट) फ्री स्टाइल कुस्ती प्रकारामध्ये द्वितीय तर शुभम बाळू निमगिरे (९७ किलो गट) फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. यापैकी जयंत नितीन शेडगे या कुस्तीपटूची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत निवड झाली आहे.
क्रीडापटुंच्या यशाबद्दल त्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), नियमाक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके) तसेच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी क्रीडापटूंना मौलिक मार्गदर्शन केले व प्राध्यापक वर्गाने क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.