फलटण : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषि महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी वाठार निंबाळकर ता.फलटण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या असून ग्रामस्थ्यांच्यावतीने या कृषि कन्यांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषि कन्या वाठार निंबाळकर येथे वास्तव्यास राहून शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञाना विषयक विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. या कालावधीत ते शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जिवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, गावातील पीक पद्धती अशा विविध बाबींचाचा अभ्यास करणार आहेत. त्याच बरोबर कृषी महाविद्यालय, फलटण मधील राधिका शिंदे, ऐश्वर्या शिंदे, सानिका झांजुर्णे, मानसी महाडिक, वैष्णवी रणवरे, ज्ञानेश्वरी धायगुडे या कृषि कन्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध ॲपद्वारे कशी संपादित करता येईल याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषि कन्या कृषि आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा.नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा.नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभणार आहे. या कृषि कन्यांनी वाठार निंबाळकर येथील ग्रामपंचायतीला भेट दिली असता त्यांचे उपसरपंच अमृत निंबाळकर, तलाठी आकाश डोमसे, कृषि साहाय्य्क अधिकारी राहुल कांबळे, मंडल अधिकारी महेंद्र देवकाते, कोतवाल कविता जगताप व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वागत केले.