सह्याद्री बाणाच्या वृत्तानंतर बांधकाम विभागाला जाग ; ‘त्या’ पुलावर तात्पुरती डागडुजी परंतु धोका कायम

फलटण : फलटण शिंगणापूर मार्गावरील कोळकी ता. फलटण गावच्या हद्दीत छोटा जीर्ण पूल खचला असून तो वाहतुकीस धोकादायक बनला असल्याचे वृत्त ‘सह्याद्री बाणाने’ प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली आहे. सदर जीर्ण पुलावर तात्पुरती डागडुजी करण्यात आली असली तरी हा पूल अद्यापही जड वाहतूकीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे या जीर्ण पूलाच्या ठिकाणी नवीन पूल होणे आवश्यक आहे.
फलटण शिंगणापूर मार्गावर कोळकी गावच्या हद्दीत शिखर शिंगाणापूरकडे जाण्यासाठी वळण घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावर या रस्त्यावरील छोटा जीर्ण पूल नुकत्याच झालेल्या पावसाने खचला आहे. सदर पूलाची डागडुजी करण्याऐवजी त्याकडे बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने, सदर पूल आणखीनच खचत चालला आहे, त्याचबरोबर पूलावरील रस्ताही खचल्याने तेथे मधोमध खड्डा पडला असून दिवसेंदिवस या खड्ड्याची खोली वाढत चालल्याने तो धोकादायक व अपघाताला निमंत्रण देणारा बनला आहे. याबाबतचे वृत्त ‘सह्यादी बाणाने’ प्रसिद्ध करताच बांधकाम विभागाने तेथे डागडुजी केली आहे. तरीही जड वाहतुकीसाठी हा पूल अद्यापही धोकादायक असून या ठिकाणी नवीन पूल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

तो जीर्ण पूल आजही कमकुवत व धोकादायकच
सदर पुलाच्या ठिकाणी नैसर्गिक ओघळ असल्याने या पुलाखालून पाणी वाहून जाण्या साठी ज्या सिमेंटच्या पाईप टाकण्यात आल्या आहेत, त्या पाणी पातळी उंचावर आहेत. त्यामुळे या पुलाच्या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात पाणी साचते, हे साचलेले पाणी पाझराद्वारे पलीकडील बाजूस जात असल्याने हा पूल कमकुवत व वाहतुकीस धोकादायक बनला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची व वाहनांची वर्दळ या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पालखी सोहळ्यापूर्वी नवीन पूलाची मंजुरी मिळविणे व त्याचे काम करने शक्य नसल्याने या जीर्ण पूलाची डागडुजी करण्यात आली असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. पालखी सोहळ्याचे फलटणहून प्रस्थान झाल्या नंतर या ठिकाणी नवीन व विस्तारित पूल करण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली करण्यात याव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!