फलटण : सखोल अभ्यास फाउंडेशन यांच्यावतीने अयोध्या येथे समर्थ रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधाचे पारायणाचा शुभारंभ आज पासून करण्यात आला आहे.
अयोध्या येथील श्री राघवजी मंदिर येथे या दासबोध पारायणाला प्रारंभ झाला असून त्याची सांगता तेवीस नोव्हेंबर होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणातील सुमारे एकशे दहा समर्थ भक्तांनी एकत्र येऊन अयोध्या मध्ये सदरचे दासबोध पारायण आयोजित केले आहे. या पारायण काळात दासबोधा शिवाय समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि आत्माराम ग्रंथांचेही पारायण होणार आहे.
दि. २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान होणार्या या पारायण काळात श्री रामलल्लांचे दर्शन, श्री हनुमानगढी दर्शन तसेच पवित्र शरयू नदीतील स्नानाचा लाभ सर्वांना होणार आहे. प.पू. अक्कास्वामी तथा आशालता वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम चालु केला आहे. या दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन आयोजित दासबोध पायरायणकर्त्यांची निवास व भोजन व्यवस्था पुण्यातील सद्गुरु ट्रॅव्हल्स यांच्या वतीने करण्यात आली आहे.
अयोध्येत समर्थ संप्रदायाच्या प्रस्थानत्रयी ग्रंथांचे एवढ्यामोठ्या प्रमाणात होत असलेले हे पहिलेच पारायण असून दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशनच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांना समर्थभक्तांना मार्गदर्शन करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.