
फलटण (किरण बोळे) :
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा
विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल
विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुक्या मुखा विठ्ठला…..
या अभंगानुसार ऊन,वारा व पाऊस यांची यत्किंचितही तमा न बाळगता पुणे जिल्हावासीयांच्या सेवेने तृप्त होवुन माळकरी, टाळकरी, किर्तनकार, प्रवचनकार, प्रबोनकार यांचा समावेश असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्हावासीयांचा भावपुर्ण निरोप घेत सातारकरांचे ऊत्स्फुर्त स्वागत स्विकारून आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. दरम्यान यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्यांनी या सोहळ्याचे स्वागत केले. जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी आज हा सोहळा लोणंद येथे विसावला.
पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथील आपला शेवटचा मुक्काम व जिल्हा सीमेवरील परंपरागत ‘नीरा स्नान’ आटोपून पालखी सोहळ्याने आज दुपारी सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी लोणंदकडे प्रस्थान केले.

ज्ञानदेव…तुकाराम…ज्ञानदेव…तुकाराम… निवृत्ती…ज्ञानदेव…सोपान…मुक्ताबाई…एकनाथ…नामदेव…तुकाराम च्या गजरात व टाळ मृदुंगाच्या जयघोषात या सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सातारा जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील, फलटणच्या प्रांत प्रियांका आंबेकर, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित पाटील, पोलिस उपअधीक्षक राहूल धस आदी मान्यवरांनी या सोहळ्याचे स्वागत केले.
सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाडेगाव ता. फलटण येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर ठिकठिकाणी भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत स्वीकारून माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता लोणंद येथील पालखी तळावर मुक्कामासाठी विसावला.

फलटण व खंडाळ्याचा अनोखा उपक्रम
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५ निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशनबाबत मार्गदर्शनाचा क्यूआर कोड https://smartpanchayat.in/palakhi/ पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदा तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे, याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
