
फलटण (किरण बोळे) :
नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी । अंती तो वैकुंठप्राप्ती, ऐसे परमेष्टी बोलिला।।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असणाऱ्या नीरा नदीमध्ये पालखी सोहळ्यातील परंपरागत ‘नीरा स्नान’ उत्साह व भावपूर्ण वातावरणामध्ये पार पडले. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने नीरा काठ दुमदुमून निघाला. नीरा स्नानानंतर नंतर पुणे जिल्ह्यातील मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी लोणंदकडे मार्गस्थ झाला.
आळंदीहून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणारा लाखो वैष्णवांचा हा मेळा आज दुपारी सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असणाऱ्या नीरा नदीच्या ठिकाणी पोहचला. यानंतर लाखो भाविकांच्या जयघोषात व उत्साहात माउलींच्या पादुकांना पालखी सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांना ‘नीरा स्नान’ घालण्यात आले. यावेळी माउलींच्या जयघोषाने नीरा काठ व परिसर दुमदुमून गेला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये ‘नीरा स्नानाला’ परंपरागत महत्त्व आहे. सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. या सोहळ्यासाठी सातारा व पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

