
फलटण : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या सातारा कार्यालयाकडून मातंग समाजातील युवक-युवतींना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेमार्फत दहावी, बारावी, पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना गुणानुक्रमे निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी २० जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक संध्या जाधव यांनी केले आहे.
महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेचा अभ्यासक्रमनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे इयत्ता दहावीसाठी रुपये पाच हजार, इयत्ता बारावी साठी सात हजार पाचशे रुपये, पदविका आणि पदवीसाठी दहा हजार रुपये, पदव्युत्तर पदवीसाठी बारा हजार पाचशे रुपये अशी शिष्यवृत्ती देण्यात येते.
या शिष्यवृत्तीसाठी जिल्हा व्यवस्थापक, सातारा यांचे नावे अर्ज करताना (पासपोर्ट साईज फोटोसह), गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, आधार कार्ड व पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याचा पुरावा ही कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. सदर अर्ज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, २२ अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ, सातारा येथे अर्ज सादर करावेत.

