
फलटण : आषाढी वारीतील दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शिक्कामोर्तब केले असून आषाढी वारी सुरू होण्यापूर्वीच राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील सुमारे ९०२ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे एकूण १ कोटी ८० लाख ४० हजार रुपये अनुदान दिंडी प्रमुखांच्या खात्यावर जमा झाले आहेत . या अनुदानाचा दिंड्यांना भजन साहित्य , ताडपत्री, डिझेल आदींसाठी उपयोग होईल असे संत सोपानदेव संस्थानचे प्रमुख ॲड त्रिगुण महाराज गोसावी यांनी सांगितले.
आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय मागील आठवड्यात जारी करण्यात आला होता . गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले होते . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी देखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली होती . प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले .
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान दिले होते . त्यानुसार यंदाही वारीतील ९०२ दिंडीस प्रत्येकी २०, ००० रुपये असे एकूण १ कोटी ८० लाख ४० हजार रुपये अनुदान सामाजिक न्याय विभाग व विशेष साह्यय यांचे वतीने विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून तात्काळ निधी सुपूर्द करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे . आत्ता ९०२ दिंडी प्रमुखांच्या खात्यावर पाठविले आहे इतर उर्वरित दिंड्यांची माहिती येत आहे . त्यां दिंड्यांना पण माहिती आली की तात्काळ निधी देत आहोत. कोणीही निधी पासून वंचित राहणार नाही असे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.

