
फलटण : ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, गुणवरे ता. फलटण येथे सायन्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थी नेतृत्व परिषद (Student Lead Conference) चेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा शुभारंभ अकलूज येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजीराव गावडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ईश्वरतात्या गावडे, संस्थेचा सचिव साधनाताई गावडे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी सायन्स डे च्या निमित्ताने वेगवेगळे प्रकल्प सादर केले व त्यांची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या मध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावेत म्हणून आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी नेतृत्व परिषद (SLC) च्या निमित्ताने नर्सरी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कम्प्युटर, अबॅकस, आर्ट अँड क्राफ्ट अशा विविध विषयांमध्ये सहभागी होते. त्यांना देण्यात आलेल्या विषयाचे त्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले.
प्राचार्य गिरिधर गावडे यांनी शाळेमध्ये राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. सहावीतील विद्यार्थिनी कु. सई निंबाळकर हिने यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

