
फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्यातील महायुतीची सरकारे समाजघटकांसाठी विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवीत आहेत. या सर्व योजना आपल्या फलटण-कोरेगाव मतदारसंघात राबवून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत. फलटण तालुक्यात आपण सर्वाधिक घरकुले मंजूर केल्याचे प्रतिपादन आ. सचिन पाटील यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) टप्पा २ मधील मंजुरी आदेश व प्रथम हप्ता वितरण निमित्त पंचायत समिती, फलटण सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आमदार सचिन पाटील बोलत होते. या वेळी पंचायत समिती माजी सदस्य संजय कापसे, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, प्रशासन अधिकारी जालिंदर शिंदे, विस्तार अधिकारी देवानंद कोपले, पांडुरंग उथळे, नवनाथ यादव उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत फलटण तालुक्यातील २,९७८ कुटुंबांना घरकुल मंजुरीपत्र आणि पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी १५ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे त्या कुटुंबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, आपणासही मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून आमदार पाटील म्हणाले, आणखी ९६९ कुटुंबांना घरकुले मंजूर आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणी विशेषत: या कुटुंबाकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने मंजुरी आदेश प्रलंबित आहेत, त्यांना ग्रामपंचायत गायरान किंवा शासकीय जागा उपलब्ध असेल तर ती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. त्यानंतर या कुटुंबांना घरकुल मंजुरी आदेश देण्यात येतील. त्याशिवाय आणखी लाभार्थी असतील तर त्यांनाही एप्रिल २०२५ नंतर घरकुले उपलब्ध होतील. प्रत्येक घरकुलासाठी आतापर्यंत १ लाख ५९ हजार रुपये दिले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी ५० हजार रुपये अनुदान वाढवून देण्याची तसेच या घरकुलांना सौर ऊर्जा व स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याचे यावेळी आ. सचिन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही घरकुल लाभार्थीना आ. सचिन पाटील व महायुतीचे पदाधिकारी यांचे हस्ते मंजूर आदेशाचे वितरण करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी केले. आभार जालिंदर शिंदे यांनी मानले.

