पारमार्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात साधकाला समर्थ वाङ्मयातील ‘अनवट वाटा’ सुयोग्य दिशादर्शक आहेत : डॉ. विजय लाड

फलटण : समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील सूत्रे मानवी जीवनासाठी ऐहिक आणि पारलौकिक पातळीवर जीवन समृद्ध करणारे नित्य नूतन तत्त्वज्ञान आहे. मानवी जीवनातील यश-अपयश, सुख-दुःख, दैनंदिन जीवनातील अनुभवास येणार्‍या समस्या, भविष्यातील भेडसावणारी चिंता अथवा पारमार्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात साधकाला येणारे अडथळे या प्रत्येक वाटेवरुन चालताना समर्थ वाङ्मयातील ‘अनवट वाटा’ सुयोग्य दिशादर्शक आहेत असे विचार जेष्ठ समर्थ भक्त डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले.
श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड, समर्थ सदन सातारा दासनवमी उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समर्थ सदन, सातारा येथे उत्सवाच्या पहिल्या दिवशी दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक डॉ. विजय लाड यांचे ‘दासबोधातील अनवट वाटा’ या विषयावर प्रवचन देताना ते बोलत होते. यावेळी समर्थ विद्यापीठाचे समर्थ भक्त शेंबेकर बुवा, सुरेश काळे, गजानन बोबडे, संतोष वाघ, राजाभाऊ कुलकर्णी, वृषाली किरपेकर , प्रकाश बारटक्के, ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या सातारा जिल्हाध्यक्षा सौ. सुनिता राजेघाटगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
श्रीमद दासबोधातील महत्त्वाचे समास आणि एकूणच समर्थ वाङ्मय कसे कालातीत आहे हे पटवून देताना डॉ. विजय लाड यांनी सांगितले की, श्रीमद दासबोधातील पहिले दहा दशक म्हणजे शंभर समास एका प्रापंचिकाला त्याचा प्रपंच व्यवस्थित करत असताना ज्ञानी अवस्थेपर्यंत नेणारे आहेत. मानवी जीवनाचा लौकिक आणि परमार्थिक या दोन्ही पातळीवर सुमधुर समन्वय साधत मिळालेला नरदेह समाज आणि राष्ट्रोद्धारासाठी सार्थकी कसा लावायचा याचे विवेचन आपल्याला दासबोधातील दशकातून, समासातून आणि ओव्यातून स्पष्ट होते. श्री समर्थांचे वाङ्मय हा एक अथांग महासागर आहे. त्याच्या काठावर वाळू आहे तर दहा फूट खोल गेले तर आपल्याला शंख शिंपले मिळतील, आणि पुढे अजून खोल गेले तर माणिक मोती मिळतील आणि असे माणिकमोती मिळवायचे असतील तर दासबोधाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल असे निदर्शनास आणून देत डॉ. विजय लाड यांनी यावेळी दासबोधातील अनेक विषय उस्फूर्तपणे, अभ्यासपूर्वक आणि आपल्या ओघवत्या रसाळ शैलीत श्रोत्यांसमोर उलगडून दाखवले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!