फलटणच्या वैभवात भर पडेल असे आदर्श बस स्थानक निर्माण करणार : आ. सचिन पाटील

फलटण : फलटण येथील बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल असा विश्वास व्यक्त करून फलटणच्या वैभवात भर पडेल असे इमारतीचा उत्तम नमुना असलेले व प्रवासी, कर्मचारी यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध असतील अशा स्वरूपाचे एक आदर्श बस स्थानक फलटण येथे निर्माण करू असे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.
फलटण आगारात आलेल्या नवीन बसेसचे पूजन केल्यानंतर आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महानंदा डेअरीचे माजी व्हाईस चेअरमन डी.के. पवार, विभागीय वाहतूक अधिक्षक ज्योती गायकवाड, प्रभारी आगार व्यवस्थापक राहूल‌‌‌ वाघमोडे यांच्यासह फलटण आगारातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

संग्रहित फोटो

फलटण आगारामध्ये बराच अंदाधुंदी कारभार सुरू असून तो थांबवण्यात यावा. योग्य कारभार करा व आगाराचे उत्पन्न वाढवा, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा कसा होईल याची काळजी घ्या असे सांगत आमदार पाटील म्हणाले, आगारातील चालक व वाहक यांना विचार करून ड्युटी लावण्यात याव्यात, सेवा निवृत्तीकडे झुकलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची मानसिकता व शारीरिक क्षमता लक्षात घेता त्यांना जवळच्या पल्ल्याच्या ड्युट्या लावण्यात याव्यात, लांब पल्ल्याच्या प्रवासाला ड्युटी लावताना तरुण वर्गाला प्राधान्य द्यावे. अधिकारी वर्गाने कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी. फलटण आगारातील घाणीचे साम्राज्य दूर करा व कामगारांचे आरोग्य सुरक्षित करा. वाढलेली झाडेझुडपे काढून टाका. बस स्थानकाच्या आवारात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव द्या, तो आम्ही मंजूर करून आणू. फलटण शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना बऱ्याच ठिकाणी अडचणी जाणवतात. थांबे असूनही अनेकदा तेथे बसेस थांबवल्या जात नाहीत, त्याचा विचार केला जावा. मुक्कामी गाड्या पूर्ववत सुरू करा. ज्या ज्या मार्गांवर बसेसची मागणी आहे तेथे टप्प्याटप्प्याने गाड्या सुरू कराव्यात, ज्या गाड्या सुरू आहेत त्यांची अवस्था चांगली करा. महिला कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधाण्य द्या, त्यांना ड्युटी लावताना वेळेचे भान राखा अशा विविध सूचना आमदार सचिन पाटील यांनी यावेळी अधिकारी वर्गाला केल्या व पुढील काळात आपण फलटण आगाराला नियमितपणे भेट देणार असल्याचे सांगितले.
फलटण येथे बारामतीच्या धर्तीवर बसस्थानक !
फलटण येथे नवीन बस स्थानकाची इमारत अगदीच बारामती सारखी नसली तरी बारामतीच्या धर्तीवर एक आकर्षक व सुविधायुक्त इमारत तयार व्हावी याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारदकांकडून आकर्षक इमारतीचा उत्तम नमुना तयार करण्यात येईल. प्रवासी व कर्मचारी यांना सर्व सुखसुविधा येथे उपलब्ध असतील अशा स्वरूपाचे एक आदर्श बस स्थानक फलटण येथे निर्माण करणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

संग्रहित फोटो

ती वाहने आरटीओ विभाग हलवणार !
फलटण बस स्थानकाच्या आवारात आरटीओने कारवाई केलेली अनेक वाहने गेली अनेक वर्ष धुळखात पडली आहेत. यामधील अनेक वाहने सडलेली आहेत. या वाहनांमुळे बस स्थानकाची जागा अडली आहे. सदर वाहने हटवण्यासंदर्भात यापूर्वी अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सदर वाहने तेथून हलणार आहेत की नाही याबाबत विचारणा केली असता याबाबत आम्ही नुकताच संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे. शंभर दिवस कृती आराखड्या मध्ये आरटीओ विभागाकडून त्याबाबत उचित कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे, तरीही आम्ही पुन्हा याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करू असे विभागीय वाहतूक अधिक्षक ज्योती गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!