फलटण : आपणास नीरा देवघर व गुंजवणीच मिळालेले असलेले अतिरिक्त पाणी भविष्यामध्ये सुमारे १६ ते १८ टीएमसी ने कमी होणार आहे. जर असे झाले तर त्यामुळे नीरा उजवा कालव्याचे सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकणार नाही. यामुळे गेल्या शंभर वर्षातील येथील शेतकऱ्यांची बारमाही सिंचनाची परंपरा खंडित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेतृत्व व जिल्हाधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला या गंभीर प्रश्नावर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला आहे असा परखड इशारा डॉ. शिवाजीराव गावडे यांनी दिला आहे.
गोखळी (पंचबिघा) ता. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२००५ च्या आसपास निरा देवघर आणि गुंजवणीचे जे विना वापराचं पाणी आम्हाला मिळालेले होते, ते पाणी भविष्यामध्ये अंदाजे १६ ते १८ टीएमसी कमी होणार असल्याने ३२ ते पाणी ३३ टीएमसी एवढे उरणार आहे. त्यामुळे या पाण्यातून उजव्या कालव्याचे सुमारे ६५ हजार हेक्टर लाभक्षेत्र सिंचित होऊ शकणार नाही, कारण हे पाणी वाढीव असल्या कारणामुळे जादाचे परवाने दिले गेले आहेत. या परिस्थितीमध्ये बंदिस्त नलिकेमुळे जे निरा देवघरचे पाणी उरणार होते, तेही पाणी धोमबलकवडीच्या कॅनॉलमध्ये सोडण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन चे काम सुरू असून ते प्रगतीपथावरती आहे. यामुळे गेल्या शंभर वर्षातील येथील शेतकऱ्यांची बारमाही सिंचनाची परंपरा खंडित होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, त्यामुळे हे पाणी मिळवण्यासाठी सर्व पाणी वापर संस्था या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यांची एकत्रितरित्या मोट बांधून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहीत याचिका दाखल करण्याच्या विचारामध्ये असल्याचे स्पष्ट करून डॉ. गावडे म्हणाले, जिल्हाधिकारी अथवा सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व या दोहोंना आम्ही याबाबत जागरूक करणार आहोत की आमच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही गांभीर्याने घ्या कारण पूर्वीपासून सुमारे शंभर वर्षापासून सुरू असलेले हे सिंचन धोक्यात येत आहे. दुसरीकडे त्याच वेळेला सोळशी प्रकल्पामध्ये जे जादाच पाणी आहे ते फलटण तालुक्याला मिळाल तर ते नीरा उजवा कालव्यातूनच देण्यात यावे. एकंदर भीती अशी आहे की, जलजीवन मिशन, वाढते औद्योगिक वापर त्याचबरोबर शहरासाठी लागणारा पाणीपुरवठा हा निरा उजवा कालव्यावरूनच होत असल्याने शेतीसाठी अतिशय कमी पाणी उपलब्ध होईल, त्याचबरोबर कारखाने अथवा शहरांमध्ये वापरले जाणारे पाणी हे रिसायकलिंग करून त्याचा पुनर्वापर करण्यात येत नाही त्यामुळे हे पाणी खूप कमी झालेले आहे. हा सर्व विचार करून आम्ही या गोष्टी पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की, याबाबत योग्य व्यक्ती अथवा जलतज्ञांचे मार्गदर्शन घ्यायचे. उपलब्ध पाणी आहे त्यामध्ये हे सर्व कसे भागवले जाइल त्यासाठी अस्तरीकरण किंवा बंदिस्त नलिका या माध्यमातून काही करता येईल का ? जे अतिरिक्त पाणी दिले त्यासाठी किंवा बेकायदेशीरपणे उपसा होत असेल तर यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता आम्ही या गंभीर प्रश्नाबाबत उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही डॉ. शिवाजीराव गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.