मुधोजी महाविद्यालयास नॅक ची ए प्लस श्रेणी

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी महाविद्यालय, फलटणने नॅकच्या चौथ्या पुनर्मल्यांकनात ए प्लस ही श्रेणी प्राप्त केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी दिली आहे.
मुधोजी महाविद्यालय हे फलटण एज्युकेशन सोसायटीचे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रथम पाच अग्रगण्य महाविद्यालयात स्थान असणारे, एक महत्त्वाचे उच्च शिक्षणाचे केंद्र आहे. बेंगलोर नॉर्थ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. निरंजना बेनाली, गोरखपुर विद्यापीठाचे डॉ.पाठक व कोईमतुरचे डॉ.शिवाकुमार यांच्या समितीने तीस सप्टेंबर व एक ऑक्टोबर या दोन दिवसाच्या महाविद्यालयीन गुणवत्ता तपासणीमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापन व मूल्यमापन पद्धती, संशोधन विकास व विस्तार सेवा, पायाभूत विकास व अत्याधुनिक अध्यापन तंत्रे, विद्यार्थ्यांची प्रगतीशीलता व रोजगार क्षमता, महाविद्यालयाचे प्रशासन व व्यवस्थापन आणि महाविद्यालयाचे पर्यावरण समतोलातील योगदान, नवोपक्रम, महाविद्यालयाचे वेगळेपण याबाबतचे निकष प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता अतिउच्च असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्याचबरोबर महाविद्यालय स्वायत्त होण्यास व नजीकच्या काळात क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून कार्य करण्यास सक्षम असल्याचेही आपल्या अहवालामध्ये नोंदविले होते. महाविद्यालयाने रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवावेत, प्राध्यापकांनी उच्च दर्जाचे संशोधन करावे व ते समाज उपयुक्त असावे असेही म्हटले होते. महाविद्यालयाने आपल्या अठ्ठावीस एकराच्या परिसरामध्ये स्वतंत्र नऊ इमारतीमध्ये विविध विभाग प्रशस्तपणे कार्यरत ठेवले आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारला आहे, विशेष करून क्रीडा, कला, एनसीसी व ग्रंथालय सुविधा अत्यंत प्रशस्त स्वरूपाच्या असून समितीने त्याचा गुणगौरव करून काही उणीवा दूर करण्यासाठी उपाय योजनाही सुचवल्या होत्या.


समितीबरोबर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच संस्थेचे खजिनदार हेमंत रानडे, महाविद्यालय विकास समितीचे समितीचे कार्य कुशल सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, अरविंद मेहता व संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सहभागी झाले होते. त्याबरोबरच समितीच्या भेटीदरम्यान गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर व विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनीही सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. या यशाबद्दल आमदार रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एच.कदम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. टी. पी. शिंदे, तसेच सर्व क्रायटेरिया चेअरमन आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्गाचे अभिनंदन व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!