फलटण : गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या परमिट रुम बार या दारु दुकानाविरोधात आळजापूर ता. फलटण येथील महिला व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी सुरु केलेला लढा आता अंतीम टप्प्यात आला आहे. आज (दि. ११ जानेवारी) रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत ग्रामपंचायत कार्यालय आळजापुर येथे मतदान होणार, गावातील सर्व ७२२ महिला मतदान करणार आहेत. त्यामुळे आळजापूर येथे बाटली उभी की आडवी राहणार याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने या दारु दुकानाला परवानगी दिली असून गावात याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच शुभम नलवडे यांनी या विषयावर तातडीने बैठक बोलावली होती. गावातील सर्वच महिला व ग्रामस्थ यांनी आपल्या गावात दारुचे दुकान नको म्हणून भूमिका घेतली होती.
विलासराव नलवडे, नितीन नलवडे व इतर सहकार्यांनी माहिती घेत जिल्हाधिकारी सातारा यांना गावातील महिलांचे सह्यांचे निवेदन दिले होते. यावर उत्पादन शुल्क विभागाने महिलांच्या सह्यांची पडताळणी करुन २५ % पेक्षा अधिक महिला मतदारांची मागणी असल्याने जिल्हाधिकारी यांनी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी या गावात मतदानाची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महिलांचा दारुबंदीचा लढा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वच युवक मंडळांनी प्रयत्न सुरु केले असून गावातील वाडी – वस्तीवर पोहचून आडव्या बाटलीचा प्रचार केला आहे. सर्व ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी यांनी दिलेल्या योगदानामुळे व शालेय विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे काढलेल्या जनजागृती रॅलीमुळे आळजापूरचा दारुबंदीचा लढा यशस्वी होणार का व दारुबंदीच्या चळवळीला बळकटी देणारा ठरणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान आडव्या बाटलीला गावातील महिला १०० % मतदान करुन दारु दुकान हद्दपार करणार असल्याचे मत व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारुबंदी चळवळीचे कार्यकर्ते विलासबाबा जवळ यांनी व्यक्त केले आहे.