फलटण : फलटण नगर परिषदेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी फलटण नगर परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते वारसा हक्कातील सोळा सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांना आमचे पुरेपूर पाठबळ व सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिली.
फलटण नगरपालिकेतील सभागृहात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, अजय माळवे, सुधीर अहिवळे यांच्यासह नगरपालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र मिळत आहे ही अत्यंत समाधानाची व आनंदाची बाब आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे त्यांनी शहर स्वच्छ व सुंदर राखण्यात चांगले योगदान दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत, नवीन कर्मचाऱ्यांनी फलटण शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या करिता स्वच्छतेच्या कामाचे योग्यरीत्या नियोजन करावे, अशी सूचना करत सफाई कर्मचाऱ्यांना आमचे पुरेपूर पाठबळ व सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी या वेळी बोलताना दिली.
मान्यवरांचे स्वागत मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले, प्रास्ताविक व आभार स्वच्छता निरीक्षक प्रकाश तुळसे यांनी मानले.
कार्यक्रमास फलटण नगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार उपस्थित होते.