डीजे व फटाकामुक्त जयंती साजरी करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचा निर्णय स्तुत्य : शिवाजी जायपात्रे

फलटण : पिंपरद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने डीजे व फटाकामुक्त जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वोत्तम व प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे महापुरुषांच्या विचार रुजविणारी जयंती साजरी झाली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे प्रतिपादन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी केले.
पिंपरद ता. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या “भीम जयंती २०२५” च्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जनार्दन भगत हायस्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब कापसे, माजी उपसरपंच अनिल ढमाळ, ग्रामपंचायत सदस्य विकास ढमाळ, पोलीस पाटील सुनील बोराटे, शिवाजीराव सुतार, संजय लाळगे, शरद मोरे, सचिन मोरे आदींची यावेळी मान्यवर उपस्थिती होती.
अनेक गावांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे त्यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे. श्रेयवादाची लढाईची सुरुवात ही महापुरुषांच्या जयंती पासूनच सुरु होते. श्रेयवादाच्या लढायातून डीजे संस्कृती पुढे आली. एखाद्या महापुरुषाच्या जयंतीला डीजे, फटाके वाजले की अन्य महापुरुषांच्या जयंतीला सुद्धा त्यापेक्षा जास्त फटाके, डीजे वाजवला जातो, अशा प्रकारामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते असे निदर्शनास आणून देत जायपात्रे म्हणाले, प्रत्येक जाती धर्मातील लोकांना आपापले महापुरुष प्रिय असतात. परंतु सर्वच महापुरुषांचे विचार हे सर्व समाजासाठी असतात याचा आपणास विसर पडता कामा नये, हा विचार आपण जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत महापुरुषांची जयंती सर्व समावेशक होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्व जाती धर्मासाठी आहे ते देशामध्ये नव्हे तर जगामध्ये आदर्शवत आहे.
महापुरुषांची जयंती साजरी करताना कर्णकर्कश डीजे, लेझर लाईटचा वापर, काही जणांचा दारू पिऊन नाचणे व अश्लील हातवारे सर्वसामान्य व जेष्ठ नागरिक यांना होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे समाजातील सुज्ञ नागरिक अशा प्रकारच्या जयंती पासून दूर राहतात. परंतु पिंपरद सारखी पारंपरिक पद्धतीची जयंती साजरी करण्याच्या निर्णय घेतला गेला तर विविध जाती धर्मातील लोकही जयंतीमध्ये सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करून पिंपरद येथील डीजे व फटाकामुक्त जयंती साजरी करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचा निर्णय स्तुत्य व प्रेरणादायी असून त्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे अशी अपेक्षाही शिवाजी जायपात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रस्ताविकामध्ये सचिन मोरे यांनी डीजे व फटाकेमुक्त जयंतीमध्ये पारंपरिक वाद्य व पारंपरिक खेळ हे जयंतीचे प्रमुख आकर्षण असणार असल्याचे सांगितले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनार्दन भगत, अनिल ढमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी निरज मोरे, विकास मोरे, विक्रांत मोरे, अमित खुडे, संतोष मोहिते, बापूराव मोरे,दयानंद मोरे, विजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!