फलटण : असंघटित घरेलू कामगारांना संघटित करण्याचे महत्वपूर्ण कार्य समता घरेलू कामगार संघटना करीत आहे. घरेलू कामगारांना त्यांचे हक्क व सन्मान मिळावा यासाठी ही संघटना कार्यरत आहे. असंघटित घरेलू कामगारांसाठी समता घरेलू कामगार संघटना आधारस्तंभ असून या संघटनेस आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही, फलटण येथील निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी दिली.
समता घरेलू कामगार संघटनेच्यावतीने घरेलू कामगारांना हक्क व सन्मान मिळावा या उद्दिष्ट्याने सातारा जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवार दि. सहा डिसेंबर रोजी फलटण शहरात नंदिवाले वसाहत येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र उद्योजक उद्योजक विकास केंद्र, सातारच्या प्रकल्प अधिकारी शीतल पाटील, संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा कल्पना मोहिते यांची यावेळी उपस्थिती होती.
स्वतःचा व्यवसाय सुरु करून चांगले अर्थार्जन प्राप्त करून यशस्वी महिला बनण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून महिलांना सेवा व उत्पादन व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही देऊन प्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांनी विविध योजनांची माहिती दिली व घरेलू कामगारांचे प्रश्न सोडविण्यास समता घरेलू कामगार संघटनेस यश मिळेल असा विश्वासही व्यक्त केला.
संघटनेचे कार्य, उद्दिष्टे व सातारा जिल्ह्यात संघटनेचे कार्य कशा पद्धतीने सुरु आहे याबाबतची माहिती कल्पना मोहिते यांनी प्रस्तविकामध्ये दिली.
प्रारंभी महपरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कल्पना मोहिते यांच्या हस्ते संविधानाची फोटो फ्रेम देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत सुनीता कांबळे, सुनीता भिंगारे यांनी केले. आभार अनिता गुंजाळ यांनी मानले.
कार्यक्रमास घरेलू काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.