फलटण : फलटण शहाराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी येथील मालोजीनगर येथे एका घरात अत्यंत दुर्मीळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) नाग आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच नेचर ॲन्ड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी,फलटणचे प्रतिनिधि व वन्यजीव रक्षक पंकज पखाले यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता, तो भारतीय चष्मेवाला नाग (Indian spectacled cobra) जातीचा अल्बिनो साप असल्याचे दिसून आले. या नागाचा रंग पुर्ण गुलाबी-पांढरट असा होता. सदर नागाला सुरक्षितरित्या पकडून त्याची नोंद संस्थेत करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
अल्बिनिझम ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे जी उत्परिवर्तन किंवा बदलांमुळे उद्भवते, जी शरीरात तयार होणाऱ्या मेलेनिनच्या प्रमाणात प्रभावित करते. मेलेनिन सापांमधे त्वचा, डोळ्यांचे रंगद्रव्य (रंग) नियंत्रित करते. अल्बिनिझम असलेल्या सापांची त्वचा व डोळे अत्यंत फिकट गुलाबी पांढरट असते, हा एक असा अनुवांशिक विकार आहे, जिथे कोणत्याही सजिवाचा जन्म नेहमीपेक्षा कमी मेलेनिन रंगद्रव्यासह होतो.
भविष्यात पुढेही असे दुर्मीळ सजीव आपल्याला पहायचे असतील तर आपण सर्वांनी मिळुन सबंध वन्यजीवांना अभय देऊन त्यांचे संरक्षण केले पाहिजे असे आवाहन नेचर ॲन्ड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.