मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शन ; संत नामदेव महाराजांच्या पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती

फलटण : श्री संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले. श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सर्वश्री आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर,विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य , आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज, श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. संतांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो. संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान होते. अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात वीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. गॉगलद्वारे देवाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास व शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्हीआर गॉगलद्वारे पाहता येणार आहे. अल्प शुल्क असलेल्या या सुविधेमुळे भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभे राहून समक्ष पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे. वर्षभरात विठुरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात, तुलनेत अनेक भाविकांना या महापूजेस उपस्थित राहण्याची इच्छा असल्याने या गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!