पुरोगामी महाराष्ट्र एकसंघ उभा करण्यासाठी एकजुटीने साथ द्या – खा. शरद पवार

फलटण – स्व. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवून पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यात असलेले फलटणकरांचे योगदान विसरता येणार नाही. लोकसभे प्रमाणेच निर्णायक मतदान करुन महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी योग्य माणसाच्या हातात द्यावा लागेल. पुरोगामी महाराष्ट्र एकसंघपणे उभा करण्यासाठी आपण खंबीर असून अगामी काळात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करण्यासाठी जनतेने एकजुटीने साथ द्यावी असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी केले.
आमदार दिपकराव चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण, माण, खटाव, कोरेगाव सह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज (दि. १४) खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत खा. शरद पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उत्तमराव जानकर, अनिल देसाई, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदींची उपस्थिती होती.
स्व. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवून पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यात असलेले फलटणकरांचे योगदान विसरता येणार नाही. आज महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा हा विचार पुढे येत असताना तीच भूमिका, तोच विचार घेऊन रामराजे, संजीवराजे व तुमच्या सारखे हजारो तरुण पुढे येतात त्यावेळी बदल निश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाल्या नंतर सामान्य लोकांच्या भावनांना हात घालणाऱ्या नवनवीन योजना पुढे येत असल्याचा आरोप करून पवार म्हणाले, बहिणी बद्दलची आस्था व्यक्त करावी लागत नाही ती मुळातच असते. कारण बहिण ही कुटुंबातील महत्वाची व जिवाभावाची व्यक्ती असते. तथापी निर्णय घेऊन बहिणीसाठी योजना सुरु केल्याबद्दल धन्यवाद देताना ही योजना या पूर्वी राज्यात फडणविसांचे सरकार होते त्यावेळी का सुचली नाही असा सवाल करून लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा आम्ही विरोधकांनी जिंकल्यावर यांना बहिणीची आठवण झाल्याचे सांगत आता तुम्हाला गप्प बसता येणार नाही लोकसभा प्रमाणेच निर्णायक मतदान करावे लागेल असे सांगितले. महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास सांगताना लोकांना मराठी भाषिक राज्य हवे होते, त्यासाठी उभारलेल्या चळवळीत फलटणकरांनी मराठी भाषिकांची शक्ती दाखवत स्व. हरिभाऊ निंबाळकर या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविले, त्यानंतर फलटण येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत स्व. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी नियुक्त करण्याचा ठराव श्रीमंत मालोजीराजे यांनी मांडला व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मराठी भाषिक राज्य डौलाने उभे राहिले असे निदर्शनास आणून देत आज फलटण बारामती मध्ये फरक जाणवतो. बारामतीचे चित्र वेगळे दिसते, त्यासाठी आम्ही कष्ट केले पण आमच्या भागातील माळेगांव व अन्य कारखानदारी उभी करण्याचा पाया श्रीमंत मालोजीराजे यांनी घातला त्यातून कारखानदारी उभी राहिली असेही पवार यांनी सांगितले. बिघडलेल्या महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणून पुन्हा एकदा लोक कल्याणकारी महाराष्ट्र उभा केल्याशिवाय हा ८४ वर्षांचा म्हातारा स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही देत त्यासाठी जनतेने साथ करण्याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
आमच्या कार्यकर्त्यांना फूस लाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथले राजकारण अस्थिर करण्याचा व आमचे खच्चिकरण करण्याचा सपाटा लावला. त्यावर तोडगा काढण्यासाठी शरीराने त्यांच्या बरोबर असलो तरी मनाने तुमच्या बरोबर होतो, आणि कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा तुतारी हाती घेण्याचा असल्याने अखेर खासदार शरद पवार यांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारुन स्वगृही येण्याचा निर्णय आम्ही घेल्याचे सांजिवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार दीपक चव्हाण, संजिवराजे, अनिकेतराजे, विश्वजितराजे यांच्यासह फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पक्षात स्वागत केले.
कार्यक्रमास विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!