साखरवाडीचा सुपुत्र ठरला राज्यस्तरीय गौरवाचा मानकरी ; सुधीर नेमाणे यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार प्रदान

फलटण : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगभूमीवर आपल्या दमदार निवेदनकौशल्याने अविरत २४ वर्षे योगदान देणारे साखरवाडी ता. फलटण चे सुपुत्र सुधीर लक्ष्मण नेमाणे यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ‘बालगंधर्व परिवार पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या शुभ हस्ते नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वाला आत्मसात करत २००१ पासून व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सुधीर नेमाणे यांनी आजवर ७०० हून अधिक “चौफुला” प्रयोग, आणि कोका कोला कंपनीच्या थम्सअप चौफुलाच्या प्रमोशनल शोमध्ये तब्बल ३०० प्रयोग यशस्वी केले आहेत. या प्रवासात त्यांना दिवंगत विनोदी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह विविध कलाकारांसमवेत काम करण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्ध निवेदक पराग चौधरी, सुशील थिगळे, गायक, संगीतकार, निवेदक चित्रसेन भंवर, विलास मडके, प्रमोद शेंडगे, सोमनाथ फाटके आणि अरुण गायकवाड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. निवेदनासोबतच मिमिक्री आणि गायनातही नेमाणे यांनी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली आहे. चौफुला, नटरंगी नार, कारभारी दमान, रंगात रंगला महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र, मदमस्त अप्सरा, तुमच्यासाठी काय पण यांसारख्या अनेक लोकप्रिय लोकधाराच्या कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. २०११ साली त्यांनी ‘कार्तिक रेकॉर्डिंग स्टुडिओ’ ची स्थापना केली. त्याचेच आजचे आधुनिक रूप म्हणजे ‘के टाईम्स मिडिया’ एक नावाजलेली अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी होय. या अंतर्गत ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया व्हिडिओज, एफ.एम. जिंगल्स, निवडणूक गीते, डिजिटल मार्केटिंग यांसह व्यावसायिक शो सादर केले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
निर्मात्याने तारीख दिली आणि मी गेलो नाही, असं एकदाही झालं नाही, आपल्या यशामागे मेघराज राजेभोसले यांचे मोठे योगदान आहे. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत शो चालूच राहतील अशी प्रतिक्रिया यावेळी सुधीर नेमाणे यांनी यावेळी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!