
फलटण : सातारा रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दादर-पंढरपूर-सातारा या एक्सप्रेसचे नामकरण ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ असे करावे, ही गाडी आठवड्यातून तीन दिवस सुटते ती आषाढी एकादशी पासून प्रतिदिन नियमितपणे सोडण्यात यावी अशी मागणी सातारा जिल्हा प्रवाशी संघ, सातारा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे माजी सदस्य व भाविकांमधून व्यक्त होत असून या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, दि. १६ मार्च २०२४ पासून सातारा येथून पंढरपूरला जाण्यासाठी ‘सातारा – पंढरपुर – दादर एक्सप्रेस’ ही रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. सदर गाडी सातारा येथुन प्रत्येक सोमवार, मंगळवार व शनिवारी दुपारी साडेतीन वाजता सुटते. सातारा येथून १३ प्रमुख रेल्वे स्टेशनवर थांबा घेत ही गाडी रात्री नऊ वाजता पंढरपूरला पोहचते. पंढरपूर वरुन पुढे दादर (मुंबई) करिता रात्री ९ वाजून दहा मिनिटांनी निघून ती सकाळी साडे सहाच्या सुमारास दादर येथे पोहचते. दादर येथुन प्रत्येक सोमवार, शुक्रवार व रविवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटून ही गाडी १४ स्टेशनवर थांबे घेत पंढरपूर येथे सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुमारास पोहचते. पंढरपूर येथून सकाळी सव्वा आठ वाजता साताराकडे मार्गस्थ झालेली ही गाडी सातारा येथे दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पोहचते. या गाडीमुळे साताऱ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांसाठी सोयीस्कर असून त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अन्य तीर्थ क्षेत्रानाही भेटी देता येत आहेत. याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मुंबईला जाण्यासाठी ही गाडी सोईची होत आहे. कमी तिकीट व किफायतशीर प्रवास यामुळे या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आषाढी एकादशी पासून सदर गाडी दररोज सोडण्यात यावी व या गाडीचे “चंद्रभागा एक्सप्रेस” असे नामकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी भाविक आणि प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे मुख्य रेल्वे महाव्यवस्थापक, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनाही पाठविण्यात आले आहे.
