हरि नामाच्या गजरात रंगला माऊलींचा रिंगण सोहळा ; ‘चांदोबाचा लिंब’ येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात’ ; परंपरागत जागा बदलल्याने गोंधळाचे वातावरण

फलटण (किरण बोळे) :
अश्व धावे अश्वामागे।
वैष्णव उभे रिंगणी।
टाळ, मृदुंगा संगे।
गेले रिंगण रंगुनी ॥
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग…माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड…दिंडीतील वारकर्‍यांच्या पायांनी धरलेला ठेका…टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरचा पहीला उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा ‘चांदोबाचा लिंब’ येथे उत्साहात पार पडला. हरि नामाच्या गजरात दुमदुमलेल्या आसमानात व अल्हाददायी वातावरणात लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. उद्या (दि. २८) रोजी हा सोहळा ऐतिहासिक फलटण नगरीत प्रवेश करणार आहे. दरम्यान परंपरागत जागेवर न होता हे रिंगण पुढे जाऊन पार पडल्याने काही काळ भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथून आज दुपारी मध्यान्ह आरती झाल्यानंतर दिड दिवसाच्या मुकक्कामानंतर हरिनामाच्या गजरात तरडगाव मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. माऊलींचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. फलटणच्या कापडगाव येथील सरदेचा ओढा येथे माऊलींचे स्वागत फलटण तालुक्याच्यावतीने आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांत प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आदी माण्यवरांनी स्वागत केले. पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्‍या विठ्ठलभक्त वारकर्‍यांना वेध लागले होते, ते या सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचे. संपुर्ण पालखी सोहळ्यातील वारकर्यांची व भाविकांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती. हा सोहळा जसा पुढे पुढे सरकत होता, तसा रस्त्यांच्या दुतर्फा असणार्‍या स्थानिक नागरिंकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वहात होता. रस्त्याकडील बाजूला असणार्‍या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूडं, भजने रंगली होती.
घर तुटकेसे छप्पर,देवाला देवघर नाही,मला दादला नको गं बाई अशा संत एकनाथ महाराजांच्या भारूडात वैष्णवजन दंग झाले होते. भारूडात रंगत येत होती, सोहळा पुढे सरकत चांदोबा येथे आला. या ठिकाणी पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्त व वारकऱ्यांनी या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान चांदोबाचा लिंब येथील परंपरागत जागेवर पार पडणारे उभे रिंगण हे यंदा भाविकांची अनावर झालेली गर्दी, अपेक्षित न पाळली गेलेली शिस्त आदी बाबींमुळे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण नियोजित व परंपरागत जागेवर झाले नाही. सदर जागेपासून सुमारे एक हजार फूट अंतर पुढे जाऊन हे रिंगण पार पडले, यामुळे काही काळ भाविक भक्तांमध्ये रिंगण झाले की नाही या बाबत काही काळ गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण होते, परंतु रिंगण झाल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माऊलींचा रथ चांदोबाचा लिंब येथून काही अंतर पुढे अपेक्षित जागेवर आल्यानंतर पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सुचना न देता वारकर्‍यांच्या गर्दीतील लाखो वारकरी दुतर्फा झाले व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. रिंगण लाऊन घेतल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजार्‍यांनी दौडत आणला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मगील दिंड्यापर्यंत नेल्यांनतर पुन्हा परत माघारी पळत आला. माऊलींच्या रथा जवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुुखांनी अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्‍याचा नैवद्य दाखविला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पुर्ण झाली. अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आशिर्वाद असतो या भावणेने अश्व ज्या ठिकाणाहुन गेला आहे, तेथील त्याच्या पाया खालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. अशा तर्‍हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. या नंतर पालखी सोहळा फलटण तालुक्यातील पहील्या मुक्कामासाठी तरडगाव येथील पालखी तळावर विसावला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!