कोळकीतील तो जीर्ण पूल खचला ; बांधकाम विभाग जागा होणार का नागरिकांचा सवाल

फलटण : फलटण शिंगणापूर मार्गावरील कोळकी ता. फलटण गावच्या हद्दीत छोटा जीर्ण पूल खचला आहे. सदर पूल खचण्याबरोबरच पुलावरील रस्ता देखील मधोमध खचल्याने येथील रस्त्यावर मधोमध खड्डा पडत चालला असून हा पूल वाहतूकीस धोकादायक बनला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची व वाहनांची वर्दळ वाढली आहे, त्यामुळे या पूलावर जर गंभीर अपघात घडला तर त्याची जबाबदारी याबाबत निष्काळजीपणा दाखविणारा बांधकाम विभाग व या विभागाचे अधिकारी घेणार का असा संतप्त सवाल या परिसरातून व्यक्त होत आहे.
फलटण शिंगणापूर मार्गावर कोळकी गावच्या हद्दीत शिखर शिंगाणापूरकडे जाण्यासाठी वळण घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावर या रस्त्यावरील छोटा जीर्ण पूल नुकत्याच झालेल्या पावसाने खचला आहे. सदर पूलाची डागडुजी करण्याऐवजी त्याकडे संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने, सदर पूल आणखीनच खचत चालला आहे,

त्याचबरोबर पूलावरील रस्ताही खचल्याने तेथे मधोमध खड्डा पडला असून दिवसेंदिवस या खड्ड्याची खोली वाढत चालल्याने तो धोकादायक व अपघाताला निमंत्रण देणारा बनला आहे. शिंगणापूर मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अवजड वाहने देखील येथून मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची व वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे येथे अपघात झाल्यावर जागे होण्यापेक्षा तत्पूर्वीच बांधकाम विभागाने हालचाल करून या पूलाची तातडीने दुरुस्ती करावी अथवा नवीन पूल करावा अशी मागणी या परिसरातून व्यक्त होत आहे.

पालखी सोहळ्यापूर्वी डागडुजी होणार का ?
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दि. १९ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. फलटण तालुक्यात हा सोहळा दि. २७, २८ व २९ जून रोजी अनुक्रमे तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्कामासाठी विसवणार आहे. या सोहळ्या दरम्यान अनेक वारकरी शिखर शिंगणापूरला जातं असतात. पालखी सोहळ्याचे फलटणहुन प्रस्थान झाल्यानंतर दिंडीतील अनेक ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ट्रॉली, बसेस फलटणहून कोळकी, वडले, पिंपरद या मार्गे प्रवास करतात. याव्यतिरिक्त अनेक दिंड्याही याच मार्गे दुपारच्या भोजनाच्या विसाव्यासाठी पिंपरदकडे मार्गस्थ होत असतात. सदर पूल छोटा असला तरी तो महत्वपूर्ण आहे. पालखी सोहळ्याच्या काळात कोळकी येथे या पूलालगतच एसटी बसेचा तात्पुरता थांबा केला जातो. त्यामुळे जर हा पूल आणखी खचला तर या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्यात आगमन होण्यापूर्वी या खचलेल्या जीर्ण पूलाचे काम मार्गी लागावे अशी मागणी व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!