फलटण तालुक्यात अतिवृष्टी ३४६ मिमी पाऊस ; विविध मार्गांवर वाहतूक ठप्प ; बाणगंगा धरण ओव्हरफ्लो ; शहरातील अनेक घरात घुसले पाणी ; प्रशासन अलर्ट मोडवर

फलटण : फलटण तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील नदी, ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असून सर्व बंधारे, पाझर तलाव, ग्राम तलाव, पाटबंधारे तलाव उन्हाळ्यात तुडूंब भरल्याने सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात अनुक्रमे ८५ व ९६ मिमी तर मागील पाच दिवसात एकूण ३४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाणगंगा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. अतिवृष्टीने बेघर झालेल्या सुमारे ६८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बाणगंगा नदीला महापूर आल्याने फलटण शहरातील नदीकाटच्या अनेक घरात पाणी शिरले आहे. अपादग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा व मदत करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे. लोकप्रतिधीही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
पूल पाण्याखाली गेल्याने अनेक मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प
अतिवृष्टीने तालुक्यातील बाणगंगा नदीसह सर्व ओढे, नाल्यांना प्रचंड पूर आल्याने सर्व तलाव ओसंडून वहात असल्याने सर्वत्र पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
रविवार (दि. २५) रोजी फलटण – दहिवडी रस्ता भाडळी, दुधेबावी दोन्ही ठिकाणच्या पुलावर पाणी असल्याने सकाळ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आळंदी – पंढरपूर – मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ९६५) नव्याने तयार करण्यात आला असून या महामार्गावर राजुरी, ता. फलटण येथे नुकतीच टोल वसुली सुरु करण्यात आली आहे, मात्र फलटण शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम अद्याप सुरु झाले नाही, बाह्यवळण रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे, त्यामुळे बहुतेक वाहतूक शहरातून सुरु आहे, गेले ३/४ दिवस या भागात प्रचंड पाऊस सुरु असल्याने सर्वच ओढे नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यातच शहरालगतच्या खडकहिरा ओढा आणि पुढे अबदागिरेवस्ती लगतच्या ओढ्याला प्रचंड पूर आल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
फलटण – सातारा रस्त्यावर मिरगाव येथील ओढ्याला पूर आल्याने ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
फलटण – शिंगणापूर मार्गावर सोनवडी व जावली येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
बाणगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे फलटण – सस्तेवाडी – कांबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
फलटण शहरातील रस्त्यावर प्रचंड पाणी : खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न
फलटण शहर व परिसरातही गेल्या ४/५ दिवसांपासून प्रचंड पाऊस होत आहे, मात्र शनिवारी दुपारी सुरु झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही न उघडल्याने संपूर्ण शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सर्व रस्ते जलमय झाले आहेत, त्यांना अक्षरश: छोट्या ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे, शहर व परिसरातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
वीजेचे खांब पडल्याने व अन्य कारणाने शहराच्या काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे, मात्र वीज वितरण अधिकारी कर्मचारी भर पावसात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

मंगळवार पेठेतील अनेक घरात पाणी
फलटण शहरातील मंगळवार पेठ भागात अनेक घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने या कुटुंबांचे प्रचंड हाल झाले असून मोठे नुकसानही झाले आहे. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी मंगळवार पेठ भागात पाहणी करुन आपदग्रस्त कुटुंबांना दिलासा दिला आहे.
खुंटे – शिंदेवाडी रस्ता गेला वाहून
खुंटे – शिंदेवाडी मार्गावरील रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे पोलिस यंत्रणेने कळविले आहे.

डोंगरावर प्रचंड पाऊस : ओढ्यांना प्रचंड पूर
सीतामाई आणि वारुगड डोंगरावर गेल्या २/३ दिवसांपासून प्रचंड पाऊस पडत असल्याने दुधेबावी, उपळवे, वेळोशी, मांडवखडक, दालवडी, विंचूर्णी, गिरवी, धुमाळवाडी या परिसरातील सर्वच ओढ्यांना प्रचंड पूर आले असून त्यावरील सर्व तलाव तुडूंब भरल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह पुढे सरकत असल्याने फलटण शहरातून जाणाऱ्या विविध रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर विडणी, धुमाळवाडी, गिरवी, निरगुडी, भाडळी, सोनवडी, तिरकवाडी वगैरे सर्वच तलाव तुडूंब भरले आहेत.
बाणगंगा धरण ओव्हर फ्लो : नदीला प्रचंड पूर
बाणगंगा नदीवरील धरण जवळपास पूर्ण भरले असून सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने तसेच धरणाच्या खालच्या बाजूला अनेक ओढे बाणगंगा नदीला मिळत असल्याने बाणगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे, धरणातील विसर्ग सुरु झाल्याने नदी काठच्या गावे, वाड्या – वस्त्यांना पुराचा धोका संभवत असल्याने तेथील नागरिकांनी सतर्क रहावे, नदीच्या पाण्यात उतरु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुळीकवाडी धरण संरक्षक भिंतीला तडे : दुरुस्ती सुरु
मुळीकवाडी येथील पाटबंधारे तलावाच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याने संबंधीत यंत्रणेने तातडीने मशिनरी आणून दुरुस्ती सुरु केली आहे.
लोणंद पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी मुळीकवाडी येथे जाऊन धरणाची पाहणी केली असून पोलिस पाटील, सरपंच व ग्रामस्थ धरण स्थळावर थांबून आहेत. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे.

आ. सचिन पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर जनतेच्या संपर्कात
आ. सचिन पाटील व माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांमार्फत संपर्क यंत्रणा निर्माण केली असून अतिवृष्टीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे, तसेच नदी, नाले, ओढ्याचे पूर व अन्य धोकादायक परिस्थितीत कोणतीही मदत लागल्यास अथवा धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास शासन, प्रशासन व व्यक्तिगत रित्या सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन देत आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन आ. सचिन पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

तहसीलदार गटविकास अधिकारी संपर्कात
दरम्यान तहसीलदार डॉ. अभिजित जाधव व गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण तालुक्यात संपर्क वाढवून अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे, तहसीलदार अभिजित जाधव हे स्वतः सहकाऱ्या समवेत भर पावसात फिरून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून सर्वतोपरी मदत करण्याची व्यवस्था असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले.
आ. सचिन पाटील आपदग्रस्त भागात
आ. सचिन पाटील यांनी खुंटे, वडजल, निंभोरे वगैरे गावात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करुन ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. आ. सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे व आमदारांचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावात भेटी देवून अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामस्थांना भेटून त्यांच्या सूचना, अडचणी जाणून घेऊन प्रशासनामार्फत त्यांना योग्य ती मदत करीत आहेत.
अतिवृष्टीने बेघर कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
अतिवृष्टीने घरात पाणी शिरल्याने बेघर झालेल्या कुटुंबांना दिलासा देत सुरक्षित स्थळी हलवून त्यांना निवारा व भोजन व्यवस्था करण्यात येत असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले.
आतापर्यंत हनुमानगर खुंटे येथील २८ कुटुंबे, हनुमंतवाडी (आसू) येथील १५, गोखळी पाटी येथील १५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
फलटण शहरातील मंगळवार पेठ भागात अनेक घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने या कुटुंबांचे प्रचंड हाल झाले असून मोठे नुकसानही झाले आहे. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी मंगळवार पेठ भागात पाहणी करुन आपदग्रस्त कुटुंबांना दिलासा दिला आहे.
फलटण तालुक्यात लहान मोठे ९१ तलाव : ६ पाटबंधारे तलाव
फलटण तालुक्यात सन १९७१ – १९७२ ते सन १९८० पर्यंत बांधलेले सुमारे ४०, सन १९८० ते १९९० दरम्यान सुमारे २५ आणि सन १९९० ते सन २०१० पर्यंत सुमारे २६ असे एकूण ९१ लघु पाटबंधारे तलाव आहेत. तर मुळीकवाडी, विडणी, तांबवे, हिंगणगाव, मिरढे, तिरकवाडी येथे पाटबंधारे तलाव असून आज हे सर्व तलाव जवळपास पूर्ण भरले आहेत. रविवार दि. २५ मे रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात फलटण तालुक्यात सरासरी ८५.३ मि.मी. आणि एकूण २५१ मि.मी. पाऊस झाला आहे.
महसूल मंडल निहाय रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात झालेला पाऊस व त्यासमोर कंसात आजअखेर झालेला एकूण पाऊस खालील प्रमाणे
फलटण १६३.५ मि.मी. (३६४.५मि.मी.), आसू ७७ मि.मी. (१९७.८ मि.मी.), होळ २० मि.मी. (१६६.४ मि.मी.), गिरवी ५८.८ मि.मी. (२७१.९ मि.मी.), आदर्की ५२.३ मि.मी. (२४६ मि.मी.), वाठार निंबाळकर १३५.३ मि.मी. (३११.५ मि.मी.), बरड ९८.८ मि.मी. (२४५.७ मि.मी.), राजाळे १०४.८ मि.मी. (२८१ मि.मी.), तरडगाव ३८.८ मि.मी. (१८४.४ मि.मी.), कोळकी १०२.८ मि.मी.(२४०.९ मि.मी.).
अतिवृष्टीमुळे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, तथापि आपण स्वतः आ. सचिन पाटील व कार्यकर्ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, प्रशासन सज्ज आहे. कोणालाही कसलीही मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी केले आहे.
अतिवृष्टीने फलटण मतदार संघात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शक्यतो कोणी घराबाहेर पडू नये, रात्री अपरात्री कसलीही अडचण उद्भवल्यास आपल्याशी संपर्क साधावा घाबरुन जाऊ नये आम्ही आपल्या सोबत आहोत असा दिलासा आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे देखील संपूर्ण तालुक्यात फिरत असून लोकांशी संपर्कात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!