
फलटण ता. १ : सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार असे विविध ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना आकर्षीत करीत आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातून सातारा जिल्हा पर्यटन हब करुन जिल्ह्याला आर्थिक चालना देणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री देसाई यांनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे ध्वजवंदन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, सर्वच क्षेत्रातील एक उज्वल परंपरा असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे अभिमानाने नाव घेतले जाते. राज्याच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. परकीय गुंतवणूकीसाठी उद्योजकांचे पसंती असणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर नेहण्याचा प्रयत्न त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही करीत आहोत.
पुर्वीच्या काळी जिल्ह्यातील नागरिक कामासाठी, पुणे, मुंबई येथे जात होते. परंतु सातारा जिल्ह्यात कृषी, आद्योगिक क्रांतीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहेत. कोयना धरणाच्या ६७ टक्के पाण्यावर २ हजार मेगा वॅट वीज निर्मिती सुरु करुन सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला वीज दिली. औद्योगीक प्रगतीबाबत सातारा जिल्हा नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे. तसेच हा जिल्हा हा डोंगरी जिल्हा आहे. या डोंगरी भागात शेती सिंचनासाठी साठवण हौद आणि वळण बंधाऱ्यांची काम येत्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवास प्रतिसाद
पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मरळी येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या महोत्सवात बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. महोत्सव कालावधीत २५ लाखांची विक्री झाली आहे. ११ हजाराहून अधिक लोकांनी या महोत्सवाच्या अनुषंगाने जलपर्यटनाचा लाभ घेतला.
महाराष्ट्र पर्यटन दलाची स्थापना
महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या कालावधीत ‘महापर्यटन उत्सव महाबळेश्वर’ चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांची सुरक्षा करणे हे पर्यटन विभागाचे काम आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन दलाची स्थापना प्रायोगीक तत्वावर करण्यात आली आहे. या पहिल्या तुकडीच्या कामकाजाचा प्रारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात यामध्ये माजी सैनिकांचाही सहभाग घेणार आहे, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापनेची औचारिक घोषणा केली. यानंतर त्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, विशेष ग्रामपंचायतींचा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार करण्यात आला तसेच पोलीस दलामध्ये विविध प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्माचिन्ह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते देण्यात आले. ध्वजारोहणापुर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व शाहू स्टेडीयम समोरील शहिद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानात जावून पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
