
फलटण : गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही पतसंस्था ठेवीदार व कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. आर्थिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेली ही पतसंस्था पुणे जिल्ह्यातही आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
गॅलेक्सी को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पिंपरी चिंचवड येथील शाखेचा शुभारंभ शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी पतसंस्थेला पुणे जिल्ह्यात आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची अधिकृत परवानगी मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ पिंपरी चिंचवड येथे करण्यात येत आहे. संस्थेचे मार्गदर्शक चेअरमन सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अ वर्ग प्राप्त असणारी ही संस्था आगामी काळात पुणे जिल्ह्यातही आपल्या शाखांचे विस्तृत जाळे निर्माण करेल व लोकप्रिय ठरेल असा विश्वास शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
विविध ग्राहकाभिमुख योजना व सुविधा, तत्पर सेवा, पारदर्शक कारभार व ग्राहकांचा विश्वास यामुळे गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वाटचाल दिमाखदारपणे सुरु आहे. गरजेच्या कालावधीत एक आश्वासक व विश्वासार्ह पर्याय म्हणून सभासदांच्या मनात संस्थेने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आगामी काळात देखील संस्था ग्राहकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नेहमीच तत्पर राहील असे संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास पिंपरी चिंचवड व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
