माऊलींची खडतर वाट सुकर करण्यासाठी लोकप्रतिनिधी ‘ऑन फिल्ड’ तर प्रशासन ‘ॲक्टिव मोड’ वर

फलटण : फलटण शहरातील पालखी मार्गाचे काम रखडल्याने यंदा फलटण शहरातील माऊलींची वाट सद्य स्थितीत खडतर बनली आहे. याबाबत फलटण शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर दि. २० जून रोजी आमदार सचिन कांबळे पाटील यांनी स्वतः पायी प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत शहरातील पालखी मार्गाची, अन्य रस्त्यांची तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पालखी तळाची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आळंदी येथून दि. १९ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. सदर पालखी सोहळा २६ जून रोजी नीरा स्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. या सोहळ्याचा दि.२७ जून रोजी फलटण तालूक्यात प्रवेश होणार आहे. दि. २८ जून रोजी हा सोहळा फलटण येथे मुक्कामासाठी विसवणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने ७५ कोटी रुपयांचा शहरांतर्गत पालखी मार्ग केंद्रस्तरावरून मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे कामही सुरु आहे, परंतु या कामाची गती मंदावल्याने व फलटण शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तानी देखील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. यंदा माऊलींची फलटण शहरातील वाटचाल खडतर होणार असल्याने अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या, परंतु आमदार सचिन कांबळे-पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पालखी मार्ग, पालखी तळ व शहरातील रस्ते व अन्य समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यांनी सार्वजनिक बांधकाम, विद्युत महामंडळ, पोलीस, आरोग्य, एमएससीबी आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत त्रुटीबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. एकंदरीत लोकप्रतिनिधी ‘ऑन फिल्ड’ तर प्रशासन ‘ॲक्टिव मोड’ वर आल्याचे चित्र सध्यातरी फलटण शहरामध्ये दिसून येत आहे.

शहरांतर्गत येणाऱ्या पालखी मार्गाचे काम ९० टक्के चांगल्या दर्जाचे झाले आहे. पूर्वीच्या काळी पालखी काळात रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम भरला जायचा परंतु आता हा रस्ता पूर्णतः कॉंक्रिटीकरण चा बनला आहे. पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी फलटण शहर ‘स्वच्छ व सुंदर’ बनेल यामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभाग कार्यरत आहे आणि आम्हीही त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
आमदार सचिन कांबळे-पाटील
आमदार सचिन पाटील व माझ्या समवेत प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी शहरांतर्गत येणाऱ्या पालखी मार्गाची व पालखी तळाची पाहणी केली. तेथील सर्व समस्यांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना आम्ही दिल्या आहेत. वारकऱ्यांच्या पायांना खडाही टोचू नये या करिता आम्ही संघर्ष करून ७५ कोटींचा शहरांतर्गत पालखी मार्ग मंजूर केला आहे व त्याचे कामही चालू आहे. ज्या गतीने या मार्गाचे काम व्हायला हवे होते तसे झाले नसले तरी केंद्राने अशा प्रकारे मंजूर केलेला देश पातळीवरील हा पहिलाच रस्ता आहे आणि तो दर्जेदारच होणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी संप्रदाय फलटण शहरामध्ये आनंदाने येईल व आनंदाने जाईल याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्याचे प्रशासन हे खुर्ची सोडून काम करत आहे, त्यामुळे पूर्वी पालखी काळामध्ये लावलीजाव होणारं काम आता आमच्या काळात होणार नाही.
रणजितसिंह नाईक निंबाळकर
माजी खासदार

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!