
फलटण : फलटण तालुक्याच्या वाट्याचे पाणी अन्यत्र कुठेही जाऊ द्यायचे नाही या आमच्या भूमिकेला शंभर टक्के यश प्राप्त झाले आहे. फलटण तालुक्याच्या वाट्याचे पाणी अन्यत्र कुठेही जाणार नाही असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आपण वाढीव पाणीपट्टीचा प्रश्नही त्यांच्यासमोर मांडला असता त्यांनी त्यालाही स्थगिती दिली आहे, अशी माहिती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देताना ते बोलत होते.
उन्हाळ्यामध्ये फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून जी पाण्याची आवर्तन मिळणार होती, ते पाणी अन्य तालुक्यात वळवले जाणार अशी चर्चा असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण होते. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकरी पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली, त्या परिसरात उपस्थित होते. कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाल्यानंतर फलटण तालुक्याचे पाणी अन्यत्र कोठेही दिले जाणार नाही हे समजतात पुणे येथे उपस्थित असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून रामराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उन्हाळ्यात नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून फलटण तालुक्याला जे आवर्तन दिले जाणार होते ते पाणी अन्यत्र वळविण्यात येणार होते. जर असे झाले असते तर शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देता आले नसते व त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले असते. फलटण तालुक्याच्या पाण्यावर राजकारण करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. उन्हाळ्यात आम्हाला जेवढ्या पाळ्या मिळतात, तेवढ्याच यंदाही मिळाव्यात. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावे हीच फलटण तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याची भूमिका असून त्याच भूमिकेतून आज आम्ही शेकडो शेतकरी या कालवा सल्लागार समितीच्या बैठक स्थळी जमा झालो असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
त्याच बरोबर कुणी कितीही प्रयत्न केले तरी रामराजे यांचे राजकीय वजन कमी होणार नाही व त्यांचे राजकारण ही संपणार नाही, ते वाढतच राहणार आहे. रामराजे हे पाण्याची व धरणाची निर्मिती करणारे नेते आहेत, त्यांच्यामुळेच फलटण तालुक्यात आज पाणी आले आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आजही रामराजे नाईक निंबाळकर यांच्याच पाठीशी आहेत. पाणी प्रश्नावर त्यांनी केलेल्या कामाची त्यांना जाणीव आहे. त्यांच्यामुळेच फलटण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी शंभर टक्के मिटणार आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान फलटण तालुक्यातील शेकडो शेतकरी कालवा सल्लागार समितीची बैठक पडणार होती त्या कौन्सलिंग, पुणे येथे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गेले होते. परंतु शेतकऱ्यांच्या गाड्या बाहेरच अडविण्यात आल्या. त्यांना आत मध्ये प्रवेश देण्यात आला नाही. आम्ही आमचे म्हणणे मांडायला येथे आलोय, आमच्या भावना काय आहेत ते जाणून तरी घ्या, परंतु हे सर्व करण्याऐवजी थेट प्रवेशच नाकारल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी जातोय अशी संतप्त भावना व्यक्त केली.

