
फलटण : कोणत्याही एका तालुक्याचे पाणी कमी करून ते अन्य तालुक्याला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कशा पद्धतीने कोणालाही पाणी देण्यात येणार नाही. निरा देवघरचे पाणी प्रत्येकाला जेवढे ठरवून देण्यात आले आहे, तेवढेच मिळणार आहे. त्यामुळे फलटण तालुक्याचे पाणी कमी करण्याचा प्रश्न येतच नाही. फलटण तालुक्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री ( गोदावरी आणि कृष्णा खोरे ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पुणे येथील कौन्सिलिंग हॉल येथे कलवा सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना, ते बोलत होते.
राजकीय पोळी भाजण्याकरिता गैरविश्वास
फलटणचे पाणी इकडे जाणार, तिकडे जाणार अशी वक्तव्य करून काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्याकरता तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने गैरविश्वास निर्माण करीत आहेत, शासनाविषयी गैरसमज निर्माण करत आहेत, मंत्री महोदयांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत ही गोष्ट निंदनीय आहे. अभ्यास न करता शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठलीही शंका उत्पन्न नाही झाली पाहिजे हे आपल म्हणणे आहे अशा भावना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कालवा समितीच्या बैठकीत व्यक्त केल्या.
हक्काचं पाणी तालुक्याला मिळालेच पाहिजे
२०१९ पासून आज अखेर जेवढे पाण्याचे आवर्तन होते. जेवढे टीएमसी पाणी फलटण तालुक्याला मिळत होते, तेवढेच पाणी याही वेळी फलटण तालुक्याला मिळावे. आजवर आम्हाला उन्हाळ्यामध्ये जवळपास साडेचार टीएमसी पाण्याचे आवर्तन मिळत होते. या पाण्यामध्ये कोणतीही कमतरता भासता कामा नये. फलटण तालुक्याच्या हक्काचं पाणी हे तालुक्याला मिळायलाच पाहिजे. फलटण तालुक्याला नेमकं किती टीएमसी पाणी दिलं जातं हे एकदा अधिकाऱ्यांनी जाहीर करावे. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बैठकांद्वारे चुकीचा संदेश पसरविला जात आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं मिळणार पाणी किती आहे याची माहिती अधिकाऱ्यांनी जनतेला द्यावी. फलटण तालुक्याच्या वाट्याचं पाणी कुठल्याही परिस्थितीत कमी नाही झालं पाहिजे अशी मागणी आमदार सचिन पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली.

