फलटण : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस आजही सार्वजनिक सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणून विश्वासपात्र आहेत. सुरक्षित सेवा हे एसटी महामंडळाचे ब्रीद आहे. एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आपले कार्य अधिक जबाबदारीने करून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यास प्राधान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा प्रा. शंभुराज नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील फलटण आगाराच्यावतीने ११ ते २५ जानेवारी या दरम्यान आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता महिना’ या मोहिमेचा शुभारंभ प्रा. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे होते. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे यांनी यावेळी प्रास्ताविकात एस.टी.महा मंडळाच्या सुरक्षितता मोहिमे विषयी माहिती देऊन ११ जानेवारी ते २५ जानेवारी अखेर सुरक्षितता मोहीम सुरु राहणार असल्याचे सांगितले.
प्रा. शिवलाल गावडे यांनी फलटण आगार नेहमीच सुरक्षिततेसाठी आघाडीवर असल्याचे नमूद करून महामंडळाच्या सुरक्षितता मोहिमेस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल वाघमोडे यांनी एसटी महामंडळात कायमच सुरक्षितता राखली जाते, प्रवाशांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जाते असे नमूद करून चालक- वाहक व कार्यशाळा कर्मचारी यांनी सुरक्षितता नियमांचे काटेकोरपणे पालन करून ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ हे महामंडळाचे ब्रीद सार्थ करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक आशुतोष चव्हाण, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, वरिष्ठ लिपिक कुलदीप चव्हाण, लहू चोरमले, चालक, वाहक व बहुसंख्य कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.