कास-कांदाटी-कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने ; पर्यटक, विद्यार्थी व संशोधकांसाठी ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

फलटण : सातारा जिल्ह्यातील कास-कांदाटी-कोयना खोरे परिसरात यंदा एक सुंदर फुलांचा आविष्कार अनुभवास मिळत आहे आणि तो म्हणजे पांढरी शुभ्र फुले असलेली ‘व्हायटी’ या प्रकारची वनस्पती ! वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी व संशोधकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा. मधमाशीपालन व्यवसाय करणाऱ्या मधपाळासाठी तर ही एक पर्वणीच आहे.
जैवविविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार व त्या सभोवतालच्या परिसराची नजाकत काही औरच आहे. दरवर्षी कास व आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो. साधारणतः ऑगस्ट मध्य ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपर्यंत या परिसरात नैसर्गिक फुले भरपूर असतात. या फुलांचा बहर ओसरला की दिसते फक्त हिरवीगार झाडी! परंतु चालू वर्षी या परिसरात पांढरी शुभ्र फुले असलेली ‘व्हायटी’ वनस्पती बाहरली आहे.
काय आहे व्हायटी वनस्पती :
पश्चिम घाट सहयाद्री क्षेत्रात फुलणारी ही झुडुप वर्गातील वनस्पती असून तीचे शास्त्रीय नाव Thelepaepale ixiocephala. Family-Acanthaceae आहे. उंची ५ फूट, आठ वर्षातून एकदा फुले येतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात. या फुलांवर सर्व प्रकारच्या मधमाशा (फुलोरी, सातेरी, आग्या, मेलिफेरा, ट्रायगोना) मध आणि पराग गोळा करण्यासाठी काम करतात.
एखादी वनस्पती फुलोऱ्यात आली व फुलोरा संपल्यावर वनस्पतीच्या बिया जमिनीवर पडतात आणि दुसऱ्या वर्षी उगवतात. नवीन वनस्पती आठ वर्षांनी फुलोऱ्यात येते व त्यानंतर मधमाशा फुलातून मुबलक प्रमाणात असणारा मकरंद आणि पराग हे दोन्हीही गोळा करतात. मकरंदाचा मध तयार होतो आणि गोळा केलेला पराग मधमाशांच्या पिलाव्याला खाद्य म्हणून वापरतात.
कालावधी –
वनस्पती फुलोरा कालावधी नोव्हेंबर – डिसेंबर आहे. तथापि सहयाद्री घाट माथा परिसरात ठिकठिकाणी फुलोरा जानेवारीपर्यंत टिकणार आहे. वनस्पती फुलात असणारी गावे- अंधारी, फळणी, उंबरी, घाटाई मंदिर, मुनावळे कास (कास परिसर), रेणोशी, खरोशी, रूळे, शिरनार, दाभेमोहन, कोट्रोशी (कोयना खोरे परिसर), गावढोशी, वाळणे, आवळण, आरव, निवळी, आकल्पे, दरे तांब, पिंपरी, लामज, उचाट, वाघावळे, वलवण, पर्वत, सालोशी (कांदाटी परिसर)


मधाची वैशिष्टये :
व्हायटी मधाचा रंग पांढरा पिवळसर असतो. व्हायटी मधातील असणाऱ्या ग्लुकोजमुळे थंडीत मधाचे कणीभवन (मध रवाळ होणे) लवकर म्हणजे २० ते ३० दिवसांत होते. पांढरा पिवळसर रवाळ मध, टोस्ट, ब्रेडबरोबर तसेच सरबत करून अथवा चपातीबरोबर आवडीने सेवन केला जातो. मधाची चव गोड, मधुर असते. हा मध बहुगुणी औषधी असून या मधास मोठी मागणी असते. मध बलवर्धक असून अशक्तपणा लवकर दूर करण्यासाठी स्नायूंना बळकटी आणण्यासाठी वापरतात.
मधमाशी पालक मधपालांना सल्ला :
मधपालांनी त्यांच्या मधपेट्या फुलोऱ्यानजीक हलवाव्यात. मध संचालनालयाकडून मेणपत्रा खरेदी करून मधुकोटी (सुपर) फ्रेम्सला लावून मधुपोळी ओढून घ्यावीत जेणेकरून येत्या काळातील हंगामात जास्तीत जास्त मध गोळा होईल. जुनी खराब झालेली मधुपोळी गाळून घेवून त्याचे मेण तयार करावे व रिकाम्या फ्रेम्सना मेणपत्रा लावून नवीन पोळी तयार करावी. कमी मधमाशा असणाऱ्या कमजोर मध वसाहती स्ट्रॉंग (मजबूत) कराव्यात. राणी पैदास व वसाहत पैदास कार्यक्रम राबवून वसाहतींची संख्या वाढवावी व रिकाम्या मधपेट्यांत वसाहती भराव्यात. वसाहतीचे विभाजन करून संख्या वाढवावी. सिलबंद झालेल्या सुपर मधील पोळयातून पक्व मधाचे संकलन करावे. वनस्पतीशास्त्र विद्यार्थ्यांनी व्हायटी मधाचे परागाचे संकलन करून पराग पृथःकरण करून परागाच्या आंतररचनेचा अभ्यास करावा. परागकणाची रचना गोलाकार असून त्यावर त्रिकोणी काटे असल्याचे दिसतील. Pollen Slide तयार करून Specimen साठी ठेवावी. वनस्पतीचे संकलन करून त्याचे हर्बेरियम करून जतन करून ठेवावे, असे आवाहन महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे माजी संचालक दिग्विजय पाटील यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!