फलटण : के. बी. उद्योग समूहातील सर्व यशस्वी विभागांप्रमाणे गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटी ही संस्था सचिन यादव व त्यांचे सहकारी यांचे कौशल्यपूर्ण नियोजन व दूरदृष्टी यामुळे आज स्पर्धामय युगात प्रगती पथावर आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती मध्ये गॅलेक्सी पतसंस्था राज्यातील अन्य पतसंस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.
फलटण शहरात गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटणच्या चौथ्या शाखेच्या कामकाजाचा शुभारंभ रामभाऊ लेंभे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. बी. उद्योग समूहाचे संचालक व गॅलेक्सीचे चेअरमन सचिन यादव होते. यावेळी सौ. सुजाता यादव, संस्थेचे व्हा. चेअरमन योगेश यादव व संचालकांची उपस्थिती होती.
आजच्या तीव्र स्पर्धामय युगात कोणत्याही संस्थेला प्रगती पथावर नेण्यासाठी संस्था चालकांना कठोर मेहनती बरोबरच सकारात्मक व्यावसायीक दृष्टिकोन, योग्य नियोजन व निर्धारपूर्वक वाटचाल करावी लागते आणि नेमकेपणाने संस्थाप्रमुख सचिन यादव यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे सर्व गुण असल्याने आज गॅलेक्सी पतसंस्था यशाची गरुड भरारी घेत असल्याचे सांगून रामभाऊ लेंभे म्हणाले, संस्थेच्या कामकाजात आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, विनम्र सेवा व ग्राहकांचे समाधान यामुळे अवघ्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीतच गॅलेक्सी पतसंस्थेचा नवलौकीक वाढला असून अगामी काळात ही पतसंस्था राज्यातील पतसंस्थांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल.
संस्था उभारताना पहिल्या पाच वर्षाचे नियोजन व प्रगतीचा आराखडा निश्चित करण्याची आणि आराखड्यानुसार कामकाज होईल यासाठी प्रयत्न करण्याची आपली पद्धत आहे, त्या प्रमाणे काम केल्याने आपण नेहमी यशस्वी झालो असल्याचे संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी यावेळी सांगितले. संस्था चालविताना आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्व असते. ठेवीदारांनी ठेवीरूपी ठेवलेला पैसा सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपल्यावर सोपविलेली असते, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आपण कधीही गफलत होऊ दिली नाही. पुढील काळात पुणे शहरात अधिक शाखा सुरु करण्याचा आपला मानस असल्याचेही सचिन यादव यांनी यावेळी सांगितले.
अगामी काळात पाच हजार नोकऱ्या देणार !
संस्थेतील अधिकारी व कर्मचारी हे प्रशिक्षित करूनच त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. वेतन योग्य प्रमाणात असल्याने प्रत्येकजण आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतात. आपल्या संस्था समूहातील एक हजार चारशे कर्मचाऱ्यांनीच आमचा ब्रँड निर्माण केला असल्याचे सांगून आपली कंपनी कमिन्स पेक्षाही अधिक वेतन व सुविधा देत आहे. अगामी काळात कंपनीचा विस्तार करून पाच हजार नोकऱ्यांची निर्मिती करून कंपनीसह त्यांच्याही कुटुंबाचा आपण सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सचिन यादव यांनी यावेळी सांगितले.