फलटण : फलटण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे दोनशे कर्मचारी व अधिकारी २७ टेबलवर २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी दिली आहे.
एकंदरीत दोन लाख ४१ हजार ३७६ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेल्या या विधानसभा निवडणुकीत कोण आमदार होणार याबाबतची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.
फलटण येथील अधिकार गृहाशेजारी असलेल्या नवीन शासकीय धान्य गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण २७ टेबल लावण्यात आले आहेत. सुरुवातीस १० टेबलवर टपाली आणि ३ टेबलवर सर्व्हिस व्होटर्स (सैन्य दलातील) मतमोजणी केली जाणार आहे. टपाली व सर्व्हिस व्होटर्स (सैन्य दलातील) ETPBS मतमोजणी १ फेरीमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर EVM मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार असून त्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. या मतमोजणीसाठी १४ टेबल वर २५ फेऱ्या आणि ५ टेबलवर २६ वी फेरी होईल. प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक मायक्रो ऑब्जरर्वर, एक तलाठी, एक शिपाई याप्रमाणे मतमोजणी व इतर तदनुषंगिक कामासाठी असे एकूण दोनशे मतमोजणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
फलटण विधानसभा मतदार संघात एकूण एक लाख ७२ हजार ९४० पुरुष व एक लाख ६६ हजार ७६८ स्त्री असे एकूण तीन लाख ३९ हजार ६६२ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख २६ हजार ३६४ पुरुष व एक लाख १५ हजार ४ अशा एकूण दोन लाख ४१ हजार ३७६ म्हणजे ७१.०६ % मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतांची मोजणी २६ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या टपाली व सर्व्हिस व्होटर्स बाबत मतदार संख्येचे आकडे उपलब्ध झाले नाहीत. या प्रक्रियेसाठी नियुक्त मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना सकाळी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना सकाळी सात वाजलेपासून मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. विविध मुद्द्यावरून आरोप प्रत्यरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या, या शिवाय लाडकी बहीण या योजनेमुळे महिला आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार याविषयीही दावे प्रतीदावे करण्यात आले होते, त्यामुळे फलटणचा आमदार कोण असणार याचे चित्र साधारणपणे सकाळी अकराच्या दरम्यान स्पष्ट होईल अशी चर्चा कार्यकर्त्यामधून व्यक्त होत आहे.