फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज (दि. १४) फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आज गुरुवार दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता फलटण शहरातील गजानन चौक येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला रासपचे मुख्य महासचिव माऊली नाना सरगर, पश्चिम महाराष्ट्राचे युवा आघाडीचे अध्यक्ष अजित पाटील, फलटण पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री आगवणे, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक आदी मान्यवरांसह रासपचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
फलटण विधानसभा मतदार संघातून महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर आगवणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. महादेवराव जानकर यांचे गेल्या अनेक वर्षातील काम, या पक्षातील कार्यकर्त्यांच असणार पाठबळ, त्याचबरोबर दिगंबर आगवणे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग असा संगम निर्माण करून त्यांना पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे असे सांगून काशिनाथ शेवते म्हणाले, महादेव जानकर हे त्यागी व चळवळीचे नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. आज पर्यंत त्यांच्यावरती कोणताही डाग नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने जो उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे, तो कुणाची जिरवण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी उतरवलेला आहे. आगवणे यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण नियोजनपूर्वक त्यांचे निवडणूक चिन्ह शिट्टी हे घरोघरी पोहोचवण्याचं काम करीत आहोत. जनतेतून त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे. चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांच्याबाबत निर्माण झालेल आहे. सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर या वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. फलटण तालुक्यातल्या प्रस्थापितांविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिगंबर आगवणे यांच्या रूपाने फलटण विधानसभा मतदारसंघाला तिसरा पर्याय मिळाला असल्याने जनता समाधानी आहे. लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडून मतदान करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दिगंबर आगवणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही काशिनाथ शेवते यांनी व्यक्त केला.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी माढा व परभणी मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या उमेदवारीने माढा मतदार संघात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच चार्जे झाले होते, त्यांनी फलटण येथे घेतलेल्या जाहीर सभेला मोठा प्रतिसाद ही मिळाला होता, परंतु जानकर यांनी परभणी मतदार संघाला पसंती देत माढ्यातून आपली उमेदवारी मागे घेतली होती. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर आज फलटणमध्ये काय व कोणावर बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.