महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करणाऱ्या भाजपाला जनतेने धडा शिकवावा ; दीपक चव्हाण एक कर्तव्यदक्ष आमदार – संजीवराजे

फलटण : महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करून पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्र रसातळाला नेण्याच काम पद्धतशीरपणे सुरू असून ते थांबवण्याचे काम शरदचंद्र पवार हे ठामपणे करीत आहेत. महाराष्ट्र राज्य व त्याचे भवितव्य सुरळीत व्हावं यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. लोकसभेप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा दुप्पट ताकदीने विधानसभा निवडणुकीत आता आपल्याला तुतारी अशी फुंकायची आहे की तिचा आवाज दिल्लीला ऐकू गेला पाहिजे, त्या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी ता. फलटण येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
काल परवा साखरवाडी येथे विरोधकांची जी सभा झाली ती विषाची परीक्षा घ्यायला लावणारी होती अमृताची नव्हती. हातात अमृताचा प्याला असताना विषाची परीक्षा करायला जाऊ नका असे आवाहन करून संजीवराजे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपूर्वी आपण सर्वांनी दीपक चव्हाण यांना आमदार म्हणून निवडून दिलं परंतु पंधरा वर्षांपूर्वीचे दीपक चव्हाण व आजचे आमदार दीपकराव चव्हाण यांच्यामध्ये आपणाला काहीही फरक दिसून येत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात नम्रता आहे. जनतेच्या सुख दुःखात समरस होणारा एक लोकप्रतिनिधी आपल्याला त्यांच्या रूपाने मिळालेला आहे. ते सुसंस्कृत व सुशिक्षित आहेत आणि त्याचबरोबर नेत्याच्या व जनतेच्या ठायी त्यांच्या मनात निष्ठा आहे. मतदार संघाला कमीपणा येईल असं कोणतही कृत्य अथवा कृती त्यांच्याकडून झालेले नाही. एक कर्तव्यदक्ष आमदार व विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडणारा आमदार या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे राज्यात पाहिलं जात.
राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडून राष्ट्रवादीमध्येच भांडण लावण्याचा भाजपचा कावा जनतेने लक्षात घ्यायला हवा. अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्या वरती टीका करायची आपण त्यांच्यावरती टीका करायची. परंतु आपण सर्व एकाच पक्षातले होतो आणि सर्वांनी एकत्र मिळून काम केलेलं आहे हे विसरून चालणार नाही असे निदर्शनास आणून देत संजीवराजे म्हणाले, मग हे सर्व घडवलं कोणी याचा कर्ता करविता कोण. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करण्याचा धनी कोण हे लक्षात घेऊन त्यांचा समूळ नायनाट करण्याचे काम आपल्याला दीपक चव्हाण यांना निवडून देऊन करायचे आहे.

विधानसभेसारखी महत्त्वाची निवडणूक असताना केवळ माझं स्क्रॅप गेलं म्हणून इकडून तिकडून जाणारे क्षुल्लक विचारांचे स्थानिक लोकप्रतिनिधी असणे हे आपलं दुर्दैव असून त्यांना फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही असेही संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!