फलटण : फलटण तालुक्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधीच जर मिनिटाला व तासाला निर्णय बदलू शकत असतील तर या फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने व मतदारांनी आपल्या नेतृत्वाशी किंवा निर्णयाशी ठाम राहण्याचे कारण काय, असा सवाल व्यक्त करून दिगंबर आगवणे यांचा प्रचार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी आपले नेते महादेव जानकर यांचं नेतृत्व खंबीर आहे, असा इशारा देत कार्यकर्त्यांनी व जनतेने कोणाचीही तमा न बाळगता संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या हातामध्ये घ्यावी व दिगंबर आगवणे यांच्या विजयाचे साक्षीदार व्हावे असे अवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जावळी ता. फलटण येथील जावळ सिद्धनाथाला मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रासपचे मुख्य महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष अजित पाटील, पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री आगवणे, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, महिला आघाडीच्या अध्यक्षा निशाताई माने यांच्यासह रासपचे तालुकास्तरीय व स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर आपणाला या राजकारणाचा संपूर्ण चिखल झालेला दिसून येईल, आणि हा चिखल होत होत असताना मागील पाच वर्षांमध्ये ज्या पक्षाला सत्तेत बसविण्यासाठी मतदारांनी मतदान केले, ते पक्ष विरोधी पक्षात बसले आणि ज्या पक्षाला विरोधी बाकावर बसवल होते ते पक्ष सत्ताधारी झाले असे निदर्शनास आणून देत काशिनाथ शेवते म्हणाले, तशीच परिस्थिती याही मतदार संघात आहे. या विधानसभा निवडणुकीचा व फलटण तालुक्याचा अभ्यास केला तर एक भाऊ एका पक्षात व त्याच आख्ख कुटुंब दुसऱ्या पक्षामध्ये, आणि दुसऱ्या उमेदवाराच्या नेतृत्वाचा विचार केला तर ज्यांनी गेली पाच वर्ष दहा वर्ष ज्या नेतृत्वाला शिव्या देऊन स्वतःच राजकारण केलं त्या नेतृत्वाच्या चिन्हवर आज त्यांचा उमेदवार उभा आहे. तालुक्यातील ही राजकीय परिस्थिती अतिशय भयानक आहे. त्यामुळे तालुक्याचे नेतृत्व करणारे नेतेच जर मिनिटाला व तासाला निर्णय बदलू शकत असतील तर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने व मतदारांनी आपल्या नेतृत्वाशी किंवा निर्णयाशी ठाम राहण्याचे कारणं काय. जर नेत्यांना वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करून स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करता येत असेल तर या मतदार संघातील जनतेचा स्वतःचा हक्काचा व सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या पाठीशी आपण का उभे राहू नये यावर सर्व मतदार राजाने विचार करने गरजेचे आहे.
महादेव जानकर यांचं नेतृत्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांनी गेली चाळीस वर्षे चळवळीतून व सामाजिक त्यागाच्या माध्यमातुन गोरगरीबांचा, कष्टकर्यांचा, शेतकऱ्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष स्थापण केला आहे. त्या पक्षाची उमेदवारी दिगंबर आगवणे यांनी घेतलेली आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या विजय निश्चित आहे. दिगंबर आगवणे यांना सर्वसामान्यांचे प्रश्न, वेदना व दुःख माहिती आहेत. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पाणी टंचाई किंवा वैद्यकीय मदत असू देत या सर्व अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारे कोण होते हा प्रश्न पडला तर निश्चितपणे दिगंबर आगवणे यांचेच नाव आपल्या डोळ्यासमोर येते. त्यांचे कार्य डोंगरावर एवढे मोठे आहे. सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत, तेव्हा कार्यकर्त्यांनी व जनतेने कोणाचीही तमा न बाळगता संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या हातामध्ये घ्यावी व दिगंबर आगवणे यांच्या विजयाचे साक्षीदार व्हावे असे अवाहनही शेवते यांनी यावेळी केले.
तर त्यांचा हिशोब चुकता करण्यास महादेव जानकर खंबीर…
या तालुक्यात दिगंबर आगवणे यांच्या प्राचारत कोण कोण कार्यरत आहे यावर विरोधकांचे बारकाईने लक्ष आहे. आणि ते अशा कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु जर तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही रासपच्या कार्यकर्त्यांना अडवून दाखवावं अस आव्हान देत जर आमच्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी महादेव जानकर यांच नेतृत्व खंबीर आहे असा परखड इशाराही काशिनाथ शेवते यांनी या वेळी बोलताना दिला.