फलटण : ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक व्हावे या दृष्टीने किरण बोळे यांनी प्रकाशित केलेला साप्ताहिक सह्याद्री बाणाचा ‘ग्राहकहीत’ हा दिवाळी अंक निश्चितपणे वाचकांच्या पसंतीस उतरेल व त्यांना तो मार्गदर्शक ठरेल असा विश्वास फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी व्यक्त केला.
साप्ताहिक सह्याद्री बाणा च्या ‘ग्राहकहीत’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. महेंद्र गांधी, डॉ. सौदामिनी गांधी, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पुणे विभागीय अध्यक्षा सुनीता राजेघाटगे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ चोरमले, फलटणच्या माजी उपनगराध्यक्षा स्वाती अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य अर्जुन रुपनवर, निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, महाराजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पत्रकार युवराज पवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सातारा जिल्हा खजिनदार नंदकुमार काटे, जिल्हा सचिव डॉ. मोहन घनवट, गुरुकुल कॉम्पुटर एज्युकेशनचे संचालक भरतेश राव, मिठाईचे प्रसिद्ध व्यापारी मनिष अग्रवाल आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थितीत होती.
समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक आहे. बाजारपेठेतून कोणत्याही स्वरूपातील वस्तूची खरेदी करताना फसवणूक होऊ नये याकरिता त्याने जागरूक राहायला हवे असे स्पष्ट करून डॉ. अभिजित जाधव म्हणाले, खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपण काय करायला हवे व काय नको हे जाणून घेण्यासाठी साप्ताहिक सह्याद्री बाणाचा ‘ग्राहकहीत’ हा दिवाळी अंक वाचकांना मार्गदर्शक ठरेल.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले यांनी केले. प्रास्तविक संपादक किरण बोळे यांनी केले. आभार डॉ. मोहन घनवट यांनी मानले.