रासपमधून निवडणूक रिंगणात ; लक्षणीय शक्तीप्रदर्शन ठरले चर्चेचे
फलटण : फलटण-कोरेगाव मतदार संघातून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना चुरशीची लढत देणारे दिगंबर आगवणे यांनी आज (दि. २९) राष्ट्रीय समाज पक्षातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जयश्री आगवणे यांनी व आगवणे समर्थकांनी केलेले लक्षणीय शक्तीप्रदर्शन चर्चेचे ठरले.
न्यायालयाने परवानगी दिल्याने आगवणे यांचा
विधानसभेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दिगंबर आगवणे यांनी यापूर्वी २०१४ साली काँग्रेसमधून व २०१९ साली भाजपमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची अनुक्रमे एकोणसाठ हजार ३४२ व शहाऐंशी हजार ६३६ मते मिळाली होती. दिगंबर आगवणे हे सध्या कारागृहात असल्याने त्यांच्या प्रचाराची संपूर्ण भिस्त त्यांच्या पत्नी फलटण पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री आगवणे व रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आगवणे समर्थकांवर राहणार आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य घटकांशी आगवणे यांचे थेट संबंध आहेत. दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांनी पुरविलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा छावणी, नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेली रोख रकमेच्या स्वरूपातील मदत व अन्य विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांच्याविषयी जिव्हाळा व सहानभूती असणारा मोठा वर्ग आजही तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे दिगंबर आगवणे यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, ते विजयी होतील का अशा विविध मुद्द्यावर आत्ता गावागावात चर्चा रंगून लागली आहे.
दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिगंबर आगवणे यांना विशेष पोलीस बंदोबस्तामध्ये फलटण येथे आणण्यात आले होते. या व्यतिरिक्त तहसील कार्यालय परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आगवणे यांच्याशी परिवारातील सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही बोलण्यास, भेटण्यास व फोटो घेण्यास पूर्णतः मज्जाव करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्या नंतर आगवणे यांची पुन्हा पोलीस बंदोबस्तात रवानगी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.