राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी या कारणासाठी कार्यकर्त्यांनी दिली संमती
फलटण : नीरा देवघर प्रकल्पातील पाण्यावरून माझा संघर्ष शरद पवार साहेब यांच्याशी होता, ते खासदार असताना त्यांच्या इच्छेखातर आमदार रामराजे यांनी निरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवले असा आमचा आरोप होता. परंतु तो प्रश्न आता मिटला आहे, संपला आहे. निरा देवघर चे पाणी फलटणच्या दिशेने निघालेलं आहे. अगामी सहा महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निरा देवघर प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील आंदरुड पर्यंत नेण्याच्या योजनेचे पूजन करून या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे निकालात काढणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे-पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीनकाका पाटील, सचिन कांबळे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांची उपस्थिती होती.
वर्षानुवर्ष ज्यांना जनतेने निवडून दिलं त्यांच्याकडून फलटण तालुक्याची मूलभूत व पायाभूत कामे मार्गी लागलेली नाहीत. सर्वसामान्य जनतेला केवळ आश्वासने दिली गेली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या सरकारने धोम बलकवडीच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे, अर्थ खात्याकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. रेल्वेचाही महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागला आहे असे निदर्शनास आणून देत रणजितसिंह म्हणाले, आपणा सर्वांना आठवणीत असेल की ज्यावेळी मी लोकसभा निवडणूक लढवीत होतो त्यावेळेस मी भाषणातून सांगितले होते की, फलटण बारामती हा रेल्वे प्रकल्प शरद पवार साहेबांनी होऊ दिला नाही, परंतु अजितदादा पवार यांनी पवार साहेबांच्या विरोधात जाऊन अधिकाऱ्यांची बैठक लावून रेल्वेचा मार्ग आम्हाला मोकळा करून दिला.
जरी मी भारतीय जनता पक्षाचा माजी खासदार असलो तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाची जागा महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्यामुळे महायुती मधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्यावतीने सचिन कांबळे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. फलटण तालुक्यातील जनतेला बदल हवा आहे आणि तो सचिन कांबळे पाटील यांच्या रूपाने झालेला आपणास दिसून येईल. फलटण कोरेगाव मतदार संघातील सर्वसामान्य जनता व महायुतीचे कार्यकर्ते यांच्या खांद्यावर सचिन कांबळे पाटील यांच्या विजयाची धुरा राहणार आहे. तालुक्यातून लोकसभेला मला अठरा हजाराच मताधिक्य मिळाले होते. या विधानसभा निवडणुकीत सचिन कांबळे पाटील यांना निश्चितपणे दुप्पट मताधिक्य मिळेल असा विश्वास रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केला. फलटण तालुक्याचा आटलेला विकास अजितदादा पवार हे मोकळा करत आहेत म्हणूनच आम्ही व आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी संमती दिली असल्याचे स्पष्ट करून फलटण तालुक्यातील जनतेला बदल हवा आहे आणि तो सचिन कांबळे पाटील यांच्या विजयाच्या रूपाने झालेला आपणास दिसून येईल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.