फलटण : महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकराव चव्हाण यांना आपण सर्वांनी मिळून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आणू व फलटण तालुक्यात नवीन राजकीय इतिहास निर्माण करू असे आवाहन करतानाच मीच या तालुक्यात भाजप आणलय व ते आणण्याचे पाप मीच आधी केल होतं अशी स्पष्टोक्ती युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांनी दिली आहे.
आमदार दीपकराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मी व स्व. आमदार चिमराव कदम यांचा गट महाविकास आघाडी सोबत आहे. आज आपण चौथ्यांदा दीपकराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जे जूनं झालं ते गेलं ते सोडून द्या. आमदार रामराजे यांची अदृश्य शक्ती आपल्या बरोबर आहे असे स्पष्ट करून सह्याद्री कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून आणून आपल्याला नव्याने इतिहास लिहायचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कामाला लागायला हवे. घरोघरी जाऊन प्रचार करावा. सर्वांनी एकदिलाने काम केले तर ही निवडणूक आपल्याला सोपी जाईल. फलटण तालुक्यात नवीन राजकीय इतिहास निर्माण होणार असून आमदार दीपक चव्हाण हेच पुन्हा चौथ्यांदा आमदार होतील असा विश्वासही कदम यांनी या वेळी व्यक्त केला.