मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार ; मराठा ओबीसी दंगल घडली तर त्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील : मनोज जरांगे-पाटील

फलटण : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबोसी समाज यांच्यामध्ये वाद घडवून दंगली घडविण्याचा डाव आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी अशा प्रकारच्या दंगली घडणार नाहीत, त्यातूनही जर का महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी अशी दंगल घडली तर त्यास देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील असे नमूद करून ही लढाई मराठा समाजाच्या अस्तित्वाची असून मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण घेतल्या शिवाय आपण स्वस्थ राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ चा नारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील सजाई गार्डन या ठिकाणी मराठा समाजाची बैठक मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मनोज जरांगे-पाटील बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी परिस्थिती निर्माण होऊ घातली आहे किंबहुना ती निर्माण केली जात आहे. मराठा समाज शांततेत लढतो, मुंबईला शांततेत जातो, शांततेत येतो त्याचा गैरफायदा उचलला जात आहे. आपल्या अंगावरती लोक घालण्याचं काम महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस हे एकटे करत आहेत असा आरोप करून जरांगे म्हणाले, मुंबई येथे मराठा समाज मोठ्या प्रमाणात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही मराठा समाज एकजूट झाला असून आता आम्ही ‘एक घर एक गाडी’ असा नाराच दिला आहे. ही लढाई आता मराठा समाजाच्या अस्तित्वाची व अंतिम असून कोणाही मराठ्याने आता घरात थांबून चालणार नाही. समाज हरता कामा नये, हसू होईल असं मराठ्यांनी वागू नये. आता जागे व्हा, राजकारण पायाखाली दाबून लेकर बाळं मोठी करण्यासाठी मराठा समाजाने आता रस्त्यावर येणे आवश्यक बनले आहे व २९ ऑगस्टला आपली ताकद मुंबईमध्ये एकत्रित जमून दाखवणे आवश्यक आहे.
ओबीसी समाजाला मराठ्यांच्या अंगावर घालण्याचा डाव आहे. मराठा व ओबीसी यांच्यात दंगली घडाव्यात हा जरी प्रयत्न असला तरी मराठा ओबीसी यांच्या दंगली घडणार नाहीत. आम्ही बांधावर राहतो, आम्हाला गावात राहावे लागते. तुम्हाला सत्तेसाठी व सत्तेवर येण्यासाठी एकदा मराठ्यांना तर एकदा धनगरांना हाताखाली धरले जाते. आणि जर का ते हाताखाली आले नाही तर दलित आणि मुस्लिम यांना हाताखाली घेतले जाते, आणि जर का तेही हाताखाली आले नाही तर ओबीसी म्हटले जाते. परंतु फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठा आणि ओबीसी असा वाद होणार नाही. मराठ्यांनो आता एकजुटीने उभे रहा मी आपल्या सर्वांच्या पोरा बाळांसाठी रात्रंदिवस झटतोय आता उघड पडू देऊ नका, त्यांनी कदाचित दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसत आहे, त्यामुळे आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. आपणास कुठेही दंगल घडून द्यायची नाही, मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचे नाही. त्यांचं स्वप्न पूर्ण होउ देता कामा नये असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाला आरक्षण देतो असे म्हणत आहेत. परंतु दुसरीकडे ते मराठा आरक्षणाबाबत काहीही बोलत नाहीत याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाबद्दल ते काही बोलत नाही हे अतिशय चांगलं झालं आहे. यामुळे कमीत कमी सरकारमध्ये असणाऱ्या मराठ्यांचे आता तरी डोळे उघडतील, त्यांच्या पोटात किती घाण गटारगंगा आहे. त्यांच्या जे पोटात होते ते ओठात आले. नियतीला हे मान्य नाही त्यामुळे जे त्यांच्या ओठातले पोटात आले ते मराठ्यांसाठी खूप चांगले झाले. सत्तेमध्ये व भाजपमध्ये असणाऱ्या मराठ्यांनी आता तरी शहाणे व्हावे. आपणाला मिडियाच्या काही प्रतिनिधींकडून असे समजले की देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, मी आता ओबीसींच्या हक्कासाठी लढणार मराठ्यांच्या हक्कासाठी नाही लढणार. तसे असेल तर मग आम्ही तुम्हाला निवडून आणण्याचा व सत्तेवर बसवण्याचा काही ठेका घेतला आहे काय, तुम्ही मराठ्यांच्या हक्कासाठी का लढणार नाही, तुम्हाला मराठे का संपायचे आहेत असा सवाल व्यक्त करून जरांगे म्हणाले, तुमचं सरकार आणण्यासाठी मराठा समाजाचे लोक रात्रंदिवस पळालेले आहेत. तरीही आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं करणार का असा सवाल व्यक्त करून कोणा एकासाठीच लढणार या पद्धतीने बोलण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. त्यांनी ओबीसींना तरी काय दिले धनगर समाजाला आरक्षण दिले का असा प्रश्नही जरांगे यांनी यावेळी उपास्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फूट पाडण्याच्या नीतीमुळं देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकारला देखील डाग लागणार आहे. ते राज्यासह देशातीलही सरकार अडचणीत आणणार आहेत. ते जर या पद्धतीने वागणार असतील तर आम्ही देखील गप्प बसणार नाही असा इशारा देत मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार असल्याचा निर्धार व्यक्त करून आपले अस्तित्व आबाधित राखण्यासाठी मराठा समाजाने संघटित व्हावे व एकजूट दाखवावी असे आवाहनही मनोज जरांगे यांनी यावेळी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!