मोगराळे घाटात काळ आला होता पण वेळ नाही ; ऑइलने भरलेल्या चौदा चाकी ट्रकच्या ब्रेक फेलचा थरार !

फलटण ता. ७ : फलटण सांगली मार्गावरील फलटण तालुक्याच्या हद्दीतील मोगराळे घाटातील पहिल्या अवघड वळणावर ऑइलने भरलेल्या अवजड ट्रकचे ब्रेक झाले. ट्रक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चालकाने चालत्या ट्रक मधून बाहेर उडी मारली, परंतु सदर ट्रक घाटातील मोडकळीस आलेल्या अवस्थेतील संरक्षक कठड्याला धडकून थांबल्याने मोठा अपघात व अनर्थ टळला.
घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, गुजरात पासिंगचा GJ 06 AX 8845 हा चौदा चाकी अवजड ट्रक वडूज येथून बडोद्याकडे कंपनीतील भट्टीसाठी लागणारे ऑइल घेऊन निघाला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास हा ट्रक मोगराळे घाट उतरत होता. शेवटच्या सी आकाराच्या वळणालगत ट्रकचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. गियरवर ट्रक थांबवता येत नसल्याचे व तो नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, सी आकाराच्या वळणावर चालकाने चालत्या ट्रक मधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचाविला. सदर चालक विरहित ट्रक घाटातील मोडकळीस आलेल्या संरक्षक कठड्याला धडकून थांबला. हा ट्रक आणखी केवळ एक फूट जरी पुढे गेला असता तर तो थेट खालील वळणावर ये जा करणाऱ्या वाहनांवर कोसळला असता. चालकाने तातडीने ट्रकच्या चाकाआड मोठ मोठे दगड टाकल्याने त्याचा वेग कमी झाला व तो थांबला त्यामुळे मोठा अपघात व अनर्थ टळला.

ते पळाले म्हणून वाचले..!
मोगराळे घाटातील या अवघड सी वळणावर परिसरातील विहंगमय दृश्य पाहण्यासाठी अनेक वाहन चालक नेहमी थांबतात. आजही काहीजण तेथे थांबले होते. समोरून तीव्र उतारावरून येणारा ट्रक वळणावरून न वळता, तो सरळ येत असल्याचे व चालकाने ट्रकमधून उडी मारल्याचे पाहताच तिथे बसलेल्या काहीनी प्रसंगावधान दाखवून तेथून पळ काढला. हा ऑइलने भरलेला ट्रक खालील वळणावर न कोसळल्याने मोठा अपघात टळाला.
मोडकळले असले तरी ठरले महत्त्वाचे
मोगराळे घाटातील संरक्षण कठड्यांचा व भिंतीचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. या घाटातील अवघड वळणावरील संरक्षण कठडे नेहमी दुरावस्थेत असतात. सद्यस्थितीतही येथील अवघड वळणावरच्या कठड्यांची अवस्था अतिशय दयनीय व मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. परंतु असे असले तरी या मोडकळीस आलेल्या अवस्थेतील कठड्यांमुळेच हा ट्रक खालील वळणावर कोसळता कोसळता वाचल्याने, सदर संरक्षण कठडे मोडकळले असले तरी मोठा अपघात व अनर्थ टाळण्यास महत्त्वाचे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया घटनास्थळाहून व्यक्त होत होत्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!