
बिजवडी : फलटण-दहिवडी या द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या कामास सुरूवात झाली आहे. रस्त्याच्या बाजूची झाडेझुडपे काढून मुरूम माती टाकून बाजूच्या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मात्र जो रस्ता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून गेला आहे, त्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही, तोवरच रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे रस्त्यात गेलेल्या शेतजमिनीची जोपर्यंत भरपाई मिळत नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू न देण्याचा निर्धार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी हरकती घेत उपोषणाचीही निवेदने दिली आहेत. बिजवडी ता.माण येथेही शेतकऱ्यांनी एकत्र येत या कामाला विरोध करत काम बंद पाडले आहे.
फलटण-दहिवडी रस्त्याचे बाजूचे काम गतीने करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने विविध गावोगावी अनेक मशीनरी लावल्या असून साफसफाई करून मुरूम टाकून तो रोलरमशीनद्वारे दाबला जात आहे. तर ज्याठिकाणी चढउतार आहे, वळण आहेत ते काढण्याचेही काम चालू आहे. काम सुरू करण्या अगोदर संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा देऊन मोजणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मोजणीची काहीच माहिती न देता थेट काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. एकतर पूर्वीचा रस्ता ज्या शेतजमिनीतून गेला आहे ती जमीन अजूनही संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर आहे. त्याचा मोबदला अजून मिळाला नाही, अन आता वाढीव भूसंपादन करताना त्याची भरपाई न देता कामाला सुरूवात केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमच्या जमिनीची भरपाई जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आमच्या हद्दीत काम करू नका, तुमच्या सर्व मशीनरी इथून घेऊन जावा असे ठेकेदाराला सांगत आहेत. या कामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही पाठींबा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांचे आपल्या शेतजमिनीकडे दुर्लक्ष आहे, त्या ठिकाणचा मुरूम खोदून दुसरीकडे नेऊन टाकला जात आहे. यालाही शेतकरी आता विरोध करत आहेत. या कामाला विरोध दर्शवत काही शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत तर उर्वरित शेतकरीही हरकती घेत आम्हाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महामार्ग विभाग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, भूमी अभिलेख, पोलीस स्टेशन यांना गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकरी निवेदन देणार आहेत.
मुरूमाऐवजी मातीचा वापर….
रस्त्याचे बाजूचे काम करताना काही ठिकाणीच मुरूम टाकला जात आहे.बहुतांश ठिकाणी मातीचाच वापर केला जात आहे.माती टाकून संबंधित ठेकेदार रस्त्याचा दर्जा कसा सांभाळणार.याकडे प्रशासन व महामार्ग विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
काम बंद पाडल्याचे पडसाद…
बिजवडीत रस्त्याचे काम बंद पाडल्याचे पडसाद दिसून येत असून ठेकेदार व महामार्ग विभाग जागा झाला आहे. ठेकेदार शेतकऱ्यांसमवेत बैठक लावून समस्यांचे निवारण करण्यासाठी ठराविक शेतकऱ्यांना फोन करत आहेत. मात्र शेतकरी प्रशासनाच्या बैठकीत जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात कोणता तोडगा निघतोय ते पाहून काम सुरू करायचे की बंद ठेवायचे हा निर्णय शेतकरी घेणार आहेत.
…तोवर काम बंद ठेवणार
रस्त्याच्या कामाविरोधात आम्ही हरकती घेतल्या आहेत.संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी आपण सर्व शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यास तयार असल्याचे सांगत आपले म्हणणे द्या म्हणत आहेत. परंतू जोपर्यंत भरपाई मिळत नाही तोपर्यंत शेतकरी काम बंद पाडणार आहेत.
दिलीपराव आवळे,माजी सरपंच पांगरी ता.माण
रस्ता अजून सातबाऱ्यावरच…
पूर्वीचा रस्ता अजून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरच आहे. अन अजूनही भूसंपादन केले जात आहे. प्रशासन व महामार्ग विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शेतजमिनीचा भरपाई देणे गरजेचे आहे. शेतकरी याविरोधात एकत्र आले असून या कामाला तीव्र विरोध करणार आहेत.
नागेश भोसले, शेतकरी बिजवडी ता. माण
शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा …
आम्हाला कोणतीही नोटीस तसेच मोबदला मिळाला नाही.आम्हाला रस्त्यात जाणाऱ्या जमिनीची नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.यासाठी आपण उपोषणाचे निवेदन दिले आहे.
दिनकर शिंदे ,पाचवड ता.माण

