स्मार्ट मिटर बाबत तालुक्यात गावोगावी उद्वेग ! कोळकीत स्मार्ट मीटर बसवू नका ; जबरदस्ती कराल तर आंदोलन करू : जयकुमार शिंदे यांचा इशारा

फलटण : कोळकी ता. फलटण येथे ग्राहकांच्या संमतीविना स्मार्ट पोस्टपेड मिटर बसाविण्याचे काम सुरु आहे ते तातडीने थांबाविण्यात यावे. कोणत्याही ग्राहकाच्या संमती विना सदर मिटर बसवू नयेत. स्मार्ट पोस्टपेड मिटरला कोळकी ग्रामस्थांचा तीव्र विरोधातून जर वीज वितरण कंपनीने हे मीटर बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिला आहे.
फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळकी गावामध्ये सध्या वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांची कोणतीही तक्रार नसताना व संमती नसताना पूर्वीचे डिजिटल मीटर काढून नवीन स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्यात येत आहेत. सदर स्मार्ट मीटरचे येणारे वीज बिल अत्यंत अवस्था असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने या मीटरबाबत फलटण तालुक्यात गावोगावी मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोळकी गावातील नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेता भारतीय जनता पक्ष व ग्रामस्थांच्यावतीने नुकतेच कोळकी गावामध्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे सदर मीटर बसवण्याचे काम तात्काळ थांबविण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व कोळकी ग्रामस्थांच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांना देण्यात आले. यावेळी निवेदनकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली व स्मार्ट मीटर बाबत तक्रार असणाऱ्या वीज ग्राहकांनी देखील वाढीव बिलाबाबतची आपली कैफियत ग्रामोपाध्ये यांच्यासमोर मांडली.
निवेदन देतेवेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काशीद, संजय देशमुख, विकास नाळे, संदीप नेवसे, यशवंत जाधव, भाजप युवा मोर्चाचे फलटण तालुका उपाध्यक्ष रणजीत जाधव, कोळकीचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किरण जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भरते, अझर मुजावर, ज्योतीराम दंडिले आदींसह ओळखी ग्रामस्थ उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया :-

“महावितरणने स्मार्ट पोस्टपेड मीटर बाबत लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करणे गरजेचे आहे. स्मार्ट मीटरचे अनेक फायदे आहेत असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु ते फायदे नेमके कशा पद्धतीचे आहेत हे लोकांना समजणे आवश्यक आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी जर चुकीच्या पद्धतीने स्मार्ट मिटर बसविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे जे पडसाद उमटतील त्यास संबंधीतच जबाबदार राहतील.”
जयकुमार शिंदे
जिल्हा सरचिटणीस, भाजपा

“सध्या बसवण्यात येत असलेले स्मार्ट पोस्टपेड मीटर हे मोफत बसविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु अगामी काळात त्याचा बोजा वीज दरवाढीच्या रूपाने ग्राहकांवर पडेल का याबाबतची स्पष्टता अद्याप नाही. जेथे जेथे ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले आहेत व अनेकांना अवाजवी लाईट बिल आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत अशा वेळी सदर मीटरची व बिलांची जबाबदारी महावितरणचे अधिकारी घेणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.”
सचिन रणवरे
मा. पंचायत समिती सदस्य, फलटण

“वीज अधिनियम २००३ मधील ४७(५) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकास आहेत. महावितरण स्मार्ट मीटर बाबत अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करीत आहे हे आम्हास मान्य नाही. ग्राहकास दिलेल्या हक्का नुसार आमचे सध्याचे आहेत तेच डिजिटल मीटर कायम ठेवण्यात यावेत व आमच्या संमती विना स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवण्यात येऊ नयेत.”
संजय देशमुख
मा. ग्रामपंचायत सदस्य, कोळकी

“वीज ग्राहकांच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाहीत. जर संमतीविना मीटर बसवण्यात येत असतील असे निदर्शनास आले तर तर तेथे आवश्यक त्या सूचना देण्यात येतील व स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. परंतु जर मीटर फॉल्टी असल्याचे आढळले तर तेथे पूर्वीच्या मीटर ऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येईल. फॉल्टी मीटर च्या जागेवर ग्राहकांनी स्वतः बाजारातून खरेदी करून मीटर बसविण्याचा प्रयत्न केला तर ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही.”
प्रदीप ग्रामोपाध्ये,
कार्यकारी अभियंता, फलटण विभाग

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!