एकत्र येतील त्यांना बरोबर घेऊन : अन्यथा एकट्याने विकास प्रक्रिया पूर्णत्वास नेणार : रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण दि. १५ : आरोप प्रत्यारोप किंवा टीका टिप्पणी करण्यापेक्षा फलटणच्या रखडलेल्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा आणि कृषी, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रांसह व विविध नागरी सुविधांमध्ये एक आघाडीचा विकसित तालुका म्हणून फलटणचा नावलौकिक वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे, सर्वार्थाने विकसित फलटण या संकल्पनेत सर्वांनी सहभागी होऊन नवे काही घडवू या असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी महामार्गाचे काँक्रीटीकरण, सुशोभीकरण ७५ कोटी रुपये आणि जलतरण तलाव, व्यायामशाळा २५ कोटी रुपये आणि शहरातील अंतर्गत रस्ते यासाठी २० कोटी रुपये अशा एकूण १२० कोटी रुपयांच्या मंजूर कामांची भूमिपूजन व प्रत्यक्ष कामांचा शुभारंभ रणजितसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिन कांबळे पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव वगैरे मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले, त्यानंतर गजानन चौक येथे आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषी पदवीधर संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव मोहिते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळ सदस्य माणिकराव सोनवलकर, संतकृपा दूध प्रक्रिया उद्योगाचे प्रमुख विलासराव नलवडे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, माजी नगरसेवक अनुप शहा व फिरोज आतार, विराज खराडे, तुकाराम शिंदे, महिला आघाडीच्या सौ. उषा राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते फलटण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आणि खा. शरद पवार यांनी फलटण शहर व तालुका विकासापासून दूर ठेवल्याने आपला त्यांना विरोध आहे, वास्तविक त्यांचे व आपले किंवा अन्य कोणाही राजकारण्यांशी आपले व्यक्तिगत भांडण नाही, तथापि राजकीय स्पर्धेतून होणारे आरोप प्रत्यारोप येथील सर्वांगीण विकासाला मारक ठरत असल्याने श्रेय वादापेक्षा विकास प्रक्रिया गतिमान करण्याची आवश्यकता असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सतत टीका करुन आपण हाती घेतलेल्या औद्योगिक वसाहत, नीरा – देवघर कालवे, धोम – बलकवडी १२ माही करणे, खाजगी साखर कारखाना उभारणी, तालुक्यातील रस्ते वगैरे विकास कामांना, ही कामे हा करु शकत नाही म्हणत एकप्रकारे आव्हान दिल्याने आपण या कामांच्या पूर्ततेसाठी अखंडित प्रयत्न केले, त्याला केंद्र व राज्य सरकारने पाठबळ दिले, आपल्या पक्षाचे नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने ही सर्व कामे किंबहुना आपण हाती घेतलेली माढा लोकसभा मतदार संघातील सर्व विकास कामे पूर्णत्वास गेली मात्र त्यासाठी मोठी मेहनत, वेळ द्यावा लागल्याने आपण सर्वांना बरोबर घेऊन विकास प्रक्रिया राबवू शकलो तर ती अधिक गतिमान होईल असा विश्वास असल्याने आपण सर्वांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, मात्र तसे घडले नाही तर आपण स्वतः तालुक्याचे चित्र पालटविण्यात कमी पडणार नाही याची ग्वाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
खा. शरद पवार व आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला तालुका अविकसीत रहावा, गुलामगिरीत रहावा यासाठी सतत प्रयत्न केल्याचा आरोप करीत खा. शरद पवार यांनी फलटणची रेल्वे अडविली, फलटण ते बारामती रस्ता होऊ दिला नाही, आपल्या हक्काचे नीरा – देवघरचे पाणी पळविले त्यामुळे आपला त्यांना विरोध आहे. वास्तविक ४ वेळा मुख्यमंत्री, एकदा या मतदार संघातून खासदार आणि गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे नेते असलेल्या खा. शरद पवार यांनी केवळ बारामतीचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणे अपेक्षीत आहे, तसे करताना फलटणकडे थोडे
अधिक लक्ष दिले असते तर हा तालुका विकासात ३० वर्षे मागे पडला नसता असे सांगत आपला त्यांच्यावर वैयक्तिक रोष नाही मात्र त्यांच्यामुळे फलटण तालुक्याचे विकासाच्या बाबतीत मोठे नुकसान झाल्याचे आपल्या मनात खुपत असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपळवेचा साखर कारखाना उभारताना कारखाना होणार नाही असे वक्तव्य केले होते, त्यामुळे आपण जिद्दीने कारखाना उभारला, नीरा – देवघरचे पाणी तालुक्यात येणार नाही म्हणाले मी आणून दाखविले, आपण खासदार होणार नाही म्हटले होते, मी खासदार होऊन दाखविले, नाईकबोमवाडी येथे एमआयडीसी होणार नाही म्हणाले आपण करुन दाखविली, लोकसभेला उमेदवारी मिळणार नाही म्हणाले आपण उमेदवारी मिळवून दाखविल्याचे निदर्शनास आणून देत आपल्यावरील टीकेला लोकहिताच्या कामातून चोख उत्तर दिले आहे.
आपल्याला बारामतीच्या विकासाशी स्पर्धा करायची आहे, तालुक्यात चांगल्या लोकांना निवडून आणायचे आहे. माझ्यामुळे फलटणचे नाव कमी होणार नाही उलट फलटणचे नाव कसे उंचावेल हे बघायचे आहे. पराभव झाला असला तरी पराभवाने खचलेलो नाही उलट आणखी जोमाने कामाला लागलो असून ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले त्यांच्या अंगावर मी सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणून गुलाल पडल्याचे बघणार आहे असा शब्द रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला.
आपण खासदार असताना कोट्यावधी रुपयाची विकास कामे फलटण तालुक्यात केली असून फलटण – बारामती रेल्वे, फलटण – पंढरपूर रेल्वे, नीरा – देवघर कालव्याची कामे, नवीन आरटीओ ऑफिस, नवीन जिल्हा न्यायालय उभारले आहे. फलटण ते बारामती फलटण ते सातारा रस्ता चौपदीकरण, आळंदी ते पंढरपूर महामार्गाचे काम केले आहे. उद्या फलटणचा जिल्हा करण्याची व येथे जिल्हाधिकारी कार्यालय करण्याची माझी मानसिकता असून माझ्या स्वप्नातला विकसित तालुका म्हणून फलटण ओळखला जावा ही प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी जनतेने साथ द्यावी सचिन कांबळे पाटील यांना विधानसभेला उभे करणार असून त्यांना मताधिक्य द्यावे असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण तालुक्यात स्वराज दूध संघ, लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना, खंडाळा तालुक्यात नवीन फ्रूट प्रोसेसिंग कंपनी स्वतःच्या मेहनतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उभारली असून या माध्यमातून हजारो जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, ते खासदार असताना फलटण तालुक्यासाठी त्यांनी विक्रमी निधी आणून विकासाच्या बाबतीत फलटण तालुक्याला अग्रेसर नेण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत विरोधकांना ३० वर्षे सत्ता असताना जे जमले नाही ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अल्पावधीत करुन दाखविले असल्याचे सचिन कांबळे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी महादेव पोकळे, बजरंग गावडे,माणिकराव सोनवलकर, ॲड. नरसिंह निकम, तुकाराम शिंदे, अनुप शहा, जयकुमार शिंदे वगैरेंची समयोचीत भाषणे झाली.
फोटो : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलताना समोर उपस्थित जनसमुदाय. (छाया : अमित साळुंखे).