
फलटण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान कर्तुत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी भावना पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या ऐतिहासिक आनंददायी घटनेचा जल्लोष साजरा करण्यासाठी पोवई नाका येथील शिवतीर्थावर शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी आणि वीरश्रीने भारलेल्या पोवाड्यांनी संपूर्ण शिवतीर्थ दुमदुमला. भगव्या पताकांनी सजवलेल्या शिवतीर्थावर सहासी खेळांचे प्रदर्शन, लेझीम खेळत शिवभक्तांनी आनंद साजरा केला.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ठ झाले आहेत. यासाठी गेले दोन वर्ष शासन पाठपुरावा करत होते. संस्कृतीक कार्य विभागाने यासाठी खूप प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा होता. परदेशात याबाबत सतत बैठका होत होत्या. अन्य देशांनी या प्रस्तावासाठी भारताला पाठिंबा द्यावा यासाठी राजनैतिक स्तरावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. त्याला यश आले आहे. असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. शिवप्रताप दिनासाठी ज्या किल्ल्याचे महत्त्व आहे, असा आपल्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा या यादीत समावेश आहे. यासाठी सर्व जिल्हावासीयांच्या वतीने आनंद व्यक्त करतो. प्रतापगड आता देशाच्या आणि जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचे, शौर्याचे एक जाणतं ज्वलंत उदाहरण म्हणून ठळकपणे अधोरेखित झाला आहे, त्यामुळे आता तो आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पर्यटन मंत्री म्हणून काम करत असताना गडकिल्ले पर्यटनाला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपण केला असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, पन्हाळा यांचे फोर्ट टुरिझमचे सर्किट डेव्हलप करण्यात येत आहे. गडांचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे असे शंभूराज देसाई यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यानिमित्त आपला आनंद, जल्लोष साजरा करण्यासाठी आज आपण शिवभक्त, शिवप्रेमी शिवतीर्थावर एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य यांच्या प्रति असणारी आपली श्रद्धा या ठिकाणच्या या आपल्या जल्लोषातून व्यक्त होत आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनीच आभार मानले पाहिजेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून यासाठी फार मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर पाठपुरावा चालू होता. या प्रयत्नांना यश आल्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांना जगाच्या नकाशावर नेण्याचे काम झाले आहे. यामुळे जगभरातील इतिहास प्रेमी, पर्यटक गडकिल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी, अभ्यासासाठी भेटी देतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी मदत होईल. या कामगिरीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य विभाग अशा सर्वांचे आभार मानले.
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ल्यांची नोंद होत असतानाच्या कार्यक्रमाचे प्रसारण
जागतिक वारसा स्थळांमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत परिपाठाच्या वेळी जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रतापगड किल्ल्याचा समावेश होत असतानाचे चित्रीकरण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. सर्व शाळांमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार ता. कराडच्या विद्यार्थी व शिक्षक यांनी तयार केलेल्या विविध व्हिडिओंचे जिल्हाअधिकारी संतोष पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.

